पुणे : लोकसभेच्या वेळी पवार साहेबांवर जी काही वक्तव्य करण्यात आली ती माझ्या मनाला लागली. लोकांसाठी ते जरी पवार साहेब असले तरी आमच्यासाठी ते काका आहेत. तरीही टीका करण्यात आली. त्याचमुळे साहेबांसोबत खंबीरपणे राहण्याचा निर्णय घेतल्याचं श्रीनिवास पवार म्हणाले. बारामती काय आहे हे महाराष्ट्राला समजलं नाही, विधानसभेलाही बारामतीकर शरद पवारांनाच साथ देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीवेळी बहिणीच्या विरोधात अजित पवारांनी स्वतःच्या पत्नीला उभे केल्याची भूमिका पटली नसल्याने त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पाटील यांनी शरद पवारांची साथ दिली होती.
अजितदादांना समजावण्याचा प्रयत्न केला
श्रीनिवास पवार म्हणाले की, एकदा बाजू घेतली तर नंतर बाजू बदलणं अवघड होतं. एकत्र कुटुंब असताना राजकारणात नव्हतो. त्यावेळी हे सगळं बाहेरून पाहत होतो. अजित पवारांनी साहेबांना सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी साहेबांवर चुकीच्या भाषेत टीका करण्यात आली. त्यामुळे साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
मी राजकारणात कधीही येणार नाही. युगेंद्र हे साहेबांच्या बाजूने होते. आताही त्यांच्यासोबत फिरतात. उद्या बारामतीतून तिकीट कुणाला मिळणार हे साहेब ठरवतील. सगळ्यांच्या विचारानेच उमेदवार ठरेल असं श्रीनिवास पवार म्हणाले.
एकीकडे भाऊ तर दुसरीकडे मुलगा
एकीकडे भाऊ तर दुसरीकडे मुलगा अशी परिस्थिती सध्या आहे. मला वैयक्तिकरित्या साहेबांचे विचार आवडतात. साहेबांची या आधीची भाषणं ऐकली. त्यांचा राजकारणाचा काळ पाहिला. त्यामुळे ते जो उमेदवार देतील त्याचा प्रचार करणार असं श्रीनिवास पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय चर्चा वगळता चर्चा होतात. शेवटी अजित पवार हे मोठा भाऊ राहणारच. मी त्याचा कायम आदर ठेवणार असं श्रीनिवास पवार म्हणाले. दिवाळीमध्ये आम्ही सगळे एकत्र असू, त्याबाबतीत कुटुंबात वेगळं काही चित्र असणार नाही असंही ते म्हणाले.
दादांच्या वागण्यात बदल, एजन्सीमुळे रंगसंगती बदलली
लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांच्या वागण्यात, बोलण्यात फरक झाला आहे. त्यावर बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की, अजितदादांमध्ये जो फरक दिसतोय तो एजन्सीमुळे झालेला आहे. त्यांच्या बोलण्यात फरक झाला. सध्या ते विचार करून बोलतात, चिठ्ठी घेऊन बोलतात. लोकसभेच्या आधी म्हणाले होते की सगळे पवार विरोधात आहेत. आता एजन्सीने सांगितल्यानंतर म्हणतात की सगळे पवार त्यांच्या प्रचारात दिसतील. पण दादाला कंट्रोल करून बोलायची सवय नाही. त्याच्या जे काही मनात असतं ते बोलतो. पण सध्या तो खूप कंट्रोल करून बोलतोय हे दिसतंय. एजन्सीने दादा अधिक सावध झालेत. हा दादा मला नवीन आहे. रंगसंगती बदलून जर फायदा होत असेल तर प्रत्येकाने तसं केलं असतं.
अजित पवार बारामती लढणार का?
श्रीनिवास पवार म्हणाले की, अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. लोकसभेला वेगळा निकाल लागला तर विधानसभेला लढणार नाही असं दादांनी दोन-तीन वेळा बोललंय. त्यामुळे तो वेगळा विचार करू शकतो. पण युगेंद्र पवार निवडणूक लढवतील हे काही माहिती नाही, पण दादांच्या पक्षातून दादा हेच उमेदवार असतील असं वाटतंय.
बारामतीकर कुणाला साथ देणार?
लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीकर साथ देणार का असा प्रश्न विचारला असता श्रीनिवास पवार म्हणाले की, बारामतीत कोण निवडून येणार ते बारामतीकर निकालात सांगतील. पण बारामतीकर साहेबांना कधीही सोडणार नाहीत हे आताही दिसेल. विधानसभेच्या मतांमध्ये वाढ निश्चित होईल. लोकसभेच्या वेळी बारामतीकरांमध्ये भीती होती. ती आता नाहीशी झाल्याने बारामतीकर मतदानासाठी अधिक संख्येने बाहेर पडतील. बारामतीकर हे साहेबांच्या विचारांचंच आहे. ते त्यांनाच साथ देणार