पुणे : राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना कोरोना बाधित रुग्णांवर प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आज रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा झालेला नाही. रेमडेसिवीरची निर्मिती करणाऱ्या प्रमुख सात कंपन्या आहेत. त्यातील महत्वाची हेटरो लॅब लिमिटेड या हैदराबाद स्थित कंपनीचा हैदराबादमधील प्लांट बंद असल्याने या कंपनीकडून रेमडेसिवीरचा पुरवठाच बंद करण्यात आलाय. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे.


हेटरो लॅब लिमिटेड या हैदराबाद स्थित कंपनीकडून अर्ध्याहून अधिक रेमडेसिवीरचा पुरवठा केला जातो. एकटी हेटरो कंपनी दररोज 35 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे उत्पादन करते तर उरलेल्या सहा कंपन्या मिळून 30 हजार इंजेक्शन्स तयार करतात. मात्र, मागील दोन दिवसांपासून हेटरो कंपनीचा हैदराबादमधील प्लांट बंद असल्याने या कंपनीकडून रेमडेसिवीरचा पुरवठाच बंद करण्यात आलाय.


बुधवारी देखील या कंपनीकडून पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा झाला नव्हता. इतर सहा कंपन्यांकडून होणाऱ्या आणि त्यातील महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचं प्रमाण नगण्य आहे. पुण्यात निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे पुण्याचे जिहाधिकारी राजेश देशमुख यांनी पाठपुरावा करून ज्या कंपनीचा सरकारबरोबर रेमडेसिवीर पुरवण्याचा करार आहे, त्या कंपनीकडून तीन हजार इंजेक्शन बुधवारी पुण्यासाठी मिळवली. मात्र, हेटरो लॅब या सर्वात मोठ्या कंपनीचा पुरवठा मात्र बंद आहे. 


पुण्याला दररोज 15 ते 18 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज 
पुण्याला सध्या दररोज 15 ते 18 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असून पुण्याचा रेमडेसिवीर इंजेक्शनचा बॅकलॉग 45 हजारांवर पोहचला आहे. कंपनीने त्यांच्या प्लांटमध्ये रेमडेसिवीर तयार करण्यास सुरुवात केल्यानंतर पहिले 14 दिवस हे टेस्टिंगमध्ये जातात. त्यामुळं प्रत्यक्ष रुग्णापर्यंत ते पोहचेपर्यंत वीस दिवस लागतात. त्यामुळं रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत कधी होणार याचं उत्तर प्रशासनाकडेही नाही.


राज्यात रेमडिसवीर इंजेक्शनचा तुटवडा


राज्यात रेमडिसवीर इंजेक्शनचा तुटवडा झाला आहे. 1 मार्च या दिवशी राज्यात 3  लाख व्हायल्स शिल्लक होत्या. त्या वेळी रोजची 15 हजार इजेक्शनची गरज होती. त्यामुळे कंपन्यांनी नव्या बॅच टाकल्या नाहीत. आता नव्या बॅच टाकल्या गेल्यात. पण त्याचे उत्पादन प्रत्यक्षात बाजारात यायला 20 एप्रिल उजाडणार आहे. अशी परिस्थिती असल्याने रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. प्रत्येक इंजेक्शन महत्वाचे ठरत आहे. अनेक जिल्हा रुग्णालयातून रेमडेसिवीर मिळेनासे झाले आहे.