चप्पलवर सूट दिली नाही म्हणून चिडलेल्या टोळक्यानं दुकान पेटवलं
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2016 05:19 PM (IST)
पुणे : पिंपरीतील एका दुकानात चप्पलवर सूट दिली नाही म्हणून दुकान पेटवून दिल्याची घटना घडली आहे. बूट आणि चप्पलच्या खरेदीवर 200 रुपयांची सूट दिली नाही म्हणून दुकानदारावर धारदार शस्त्रानं वार करून त्याचं दुकानच पेटवून देण्यात आलं आहे. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील मोरवाडीमध्ये ही घटना घडली आहे. टोळक्याच्या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला आहे, तर पेट्रोल आणि रॉकेल टाकून आग लावल्यानं दुकानाचं लाखोंचं नुकसान झालं आहे. या आगीमध्ये चार चपलांची दुकानं, एक गॅरेज आणि 6 बुलेट गाड्या जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण आणि जाळपोळप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील तिघेही अल्पवयीन आहेत. या जाळपोळीत आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.