पुणे : देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Shivaji maharaj) मोठ्या उत्साहात आणि विविध उप्रकमांनी साजरी केली जात आहे. त्यातच, छावा (Chhaava) सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सिनेमागृहात शिवभक्त आणि शिवप्रेमींनी गर्दी केली असून सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि शौर्य व बलिदानाची कथा या सिनेमाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. स्वराज्य आणि धर्मासाठी त्यांनी भोगलेल्या यातना आणि त्याग पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणवत आहेत. त्यामुळेच, या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा असून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये (Pune) छावा सिनेमा मोफत दाखवण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधत छावा चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान सर्वदूर पोहचावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. पारंपरिक वेशभूषेत शिवभक्तांनी यासाठी हजेरी लावली असून महिलांनीही डोक्यावर भगवे फेटे परिधान करुन छावा सिनेमा पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवडमधील सिनेमागृहात याचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने 'छावा' चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी देखील आयोजक व प्रेक्षकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, छावा सिनेमाने 4 दिवसांत 150 कोटींचा आकडा गाठला असून बॉक्स ऑफिससह बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घातला आहे. त्यातच, शिवजयंतीच्या निमित्तानेही सिनेमागृह हाऊसफुल्ल असून छावा सिनेमा पाहून शिवभक्तांकडून शिवजंयती साजरी केली जात आहे.
विकी कौशल रायगडावर
छावा चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशलने आज शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. मला पहिल्यांदा किल्ले रायगडावर येण्याचा योग आला, सगळ्यांना माझे धन्यवाद. माझं नशीब, माझं सौभाग्य आहे की, मला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेता आलं. आजचा दिवस माझासाठी सर्व काही आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच आहे.
छावा सिनेमातील डायलॉग
किल्ले रायगडावर येऊन कस वाटलं, असा प्रश्न अभिनेता विकी कौशलला विचारण्यात आला होता. त्यावर, आज DIVINE फिलिंगसारखं मला वाटत आहे, रायगडावर येऊन आज सर्वसंतुष्ट वाटलं, असेही विकीने म्हटले. शेर नही रहा लेकीन छावा अभी भी जंगल मे घूम रहा है, हम शोर नहीं करते सीधा शिकार करते है .. असं म्हणत त्यांनी चित्रपटातील डायलॉग देखील पत्रकारांच्या आग्रहास्तव मारुन दाखवला.