Uddhav Thackeray Birthday : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झालेले पुण्यातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी तशी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचाच फोटो आहे. गेल्याच आठवड्यात शिवाजी आढळराव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. परंतु त्यांचा फोटो मात्र या पोस्टमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांनी टाळलेला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच शिवाजी आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावरुनच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा त्यांनी त्या पोस्टमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो टाकणं टाळलं होतं. त्यानंतर या शुभेच्छांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आढळराव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मग काही तासांतच यू टर्न घेत, आढळराव पक्षातच असल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र या कारवाईमुळे नाराज झालेले आढळराव काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले.
आता उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आढळराव यांनी ही खबरदारी घेतली आहे. त्यांनी ज्यांना नेतृत्व मानलं आहे त्या एकनाथ शिंदे यांचे फोटो टाकणं यावेळी टाळलं आहे.
उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवसमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. तसंच एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर हे एकप्रकारे शक्तिप्रदर्शन असणार आहे.
नव्याने पक्षबांधणी करण्याचं आवाहनएकनाथ शिंदे गटाची बंडखोरी, आमदार, खासदारांसह नगरसेवक,पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहेत. एकीकडे एक-एक जण उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना दुसरीकडे खरी शिवसेना कोणती यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. त्यातच नव्याने पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नव्याने उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात ते राज्याचा दौरा करणार आहेत.