Pune Ganeshotsav 2022:   यंदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात होणार आहे. त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील महत्वाचा शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. नागरीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक गुन्हे शाखेचे उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी दिली आहे. 


पर्यायी मार्ग कोणते असतील?
शिवाजी रस्ता बंद असल्याने त्यासाठी वाहतूक शाखेने काही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. नागरीकांनी त्या मार्गाचा वापर करावा, असं आवाहन देखील केलं आहे. गाडगीळ पुतळा चौकातून कुंभार वेस, शाहीर अमर शेख चौकामार्गाचा वापर करावा. तर स्वारगेट कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी मॉडर्न कॅफे चौकातून जंगली महाराज रोडवरुन किंवा टिळक रोडचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


वाहतुकीसाठी खुले असलेले रस्ते
फडके हौद चौक, जिजामाता चौक, फुटका बुरुज चौक हे रस्ते सुरु असणार आहे. त्यासोबतच आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, मोती चौक, सौन्या मारोती चौक, बेलबाग चौक, सेवा सदन चौक, मंगला चित्रपटगृह या सगळ्या मार्गावरुन वाहतूक सुरु असणार आहे. 


पीएमपीएलसाठी वेगळे मार्ग
पीएमपीएल बसेस साठी देखील पर्यायी मार्ग दिलेले आहेत.  अथर्व पठण साठी येणाऱ्या महिलांना वाहतुकीची अडचण होणार नाही याची दखल घेण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितलं आहे.


दोन दिवस दारु विक्री बंद
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 2 दिवस दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात शांतता रहावी यासाठी हे आदेश काढण्यात आले आहे. दोन दिवस कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात दारु विक्रीला बंदी करण्यात आली आहे. सगळ्या दारु विक्रेत्यांना या संगर्भातच्या सुचना देण्यात आल्या आहे. या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे.