पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाई वरून खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले आहे. या संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत या गोष्टीचा निषेध केला आहे. दरम्यान, या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी उद्या (19 फेब्रुवारी) रोजी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत.
काय आहे खासदार संभाजीराजे यांची पोस्ट
"भारतीय पुरातत्त्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो", अशा भावना खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केल्या आहेत.
पुरातत्व खात्याने यासाठी परवानगी दिलीच कशी? : खासदार संभाजीराजे
रायडावर कोणतेही काम करायचे असल्यास पुरातत्त्व खात्याकडून निरनिराळ्या परवानग्या घेण्यासाठी स्वतः मला अनेक नियमरूपी अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्या पुरातत्त्व खात्याच्या नियमांमध्ये या गोष्टी बसतात का? याचा खुलासा पुरातत्त्व खात्याने करणे गरजेचे आहे.
दुर्गराज रायगडच्या राजसदरेवर एखाद्या मॉडर्न गार्डन सारखी लाईट लावून काय साध्य केलं?
'लाईट अँड साऊंड शो'च्या माध्यमातून गडाचे वास्तुसौंदर्य दर्शविणारे सौम्य 'फसाड लाईट' गडावर लावण्यात येणार आहेत, त्यासाठी पुरातत्त्व खात्याची परवानगी प्रलंबित असल्याने प्राधिकरण थांबले असताना, अशाप्रकारची झगझगीत लाईट गडावर लावणे अतिशय दुर्दैवी आहे.