शिरुर, पुणे : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil)  आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे  (Shirur Lok Sabha Constituency) ते राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील. मात्र यात पक्षप्रवेशापुर्वी आढळराव पाटलांनी एक सुचक विधान केलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाताला घड्याळ  (Lok Sabha Election 2024)  बांधणार असलो तरीही माझ्या हातात शिवबंधन कायम बांधलेलं असेल, असं ते म्हणाले आहेत. पक्षप्रवेशापूर्वी आढराव पाटलांनी विविध मुद्यांवरदेखील भाष्य केलं आहे. 


महाविकासआघाडी सरकारच्या काळात मी अजित पवारांवर नव्हे तर  उद्धव ठाकरेंवर टीका करायचो असा दावा आढळरावांनी केला आहे. आजचा प्रवेश ही घरवापसी अथवा लोकसभेच्या अनुषंगाने पर्याय नाही. तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे आम्ही उचलेलं पाऊल आहे. असं म्हणत अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचं अजित पवारांनी दिलेलं आव्हान मी माझ्या खांद्यावर उचललं आहे, असा विश्वास आढळरावांनी व्यक्त केला आहे. 


आढळराव पाटील पुढे बोलताना म्हणाले की, शिरुरची जागा मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. अजित पवार महायुतीत सामील होण्याआधीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं की शिरुर मतदार संघात काम सुरु करा, आपल्याला मतदार संघ जिंकायचा आहे. तेव्हापासून पायाला भिंगरी लावून मतदार संघाचं काम करतोय. काम करण्यासाठी महायुतीच्या सरकारने प्रचंड बळ दिलं. विकास निधी दिला. सर्व प्रकारचं सहकार्य केलं, असंही ते म्हणाले. 


2004 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 20 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहात ही घरवापसी आहे का?, असं विचारल्यावर ही घरवापसी नाही आणि मी पक्ष बदलणाऱ्यातला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 20 वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत प्रामाणिक राहिलो, असंही ते म्हणाले.


यासोबतच आढळराव पाटलांनी विरोधी उमेदवार असलेल्या अमोल कोल्हेंवर निशाणा साधाला आहे. नाटकाच्या स्टेजवर शिवशाही दाखवून लोकांची मतं मिळवण्याची परिस्थिती आता राहिली नाही, असं ते म्हणाले आहेत.


मंचावर लागलेल्या फ्लेक्सवर घड्याळ चिन्ह गायब


शिंदे गटाच्या शिवाजी आढळरावांचा पक्षप्रवेश आज होणार आहे. मात्र जाहीर प्रवेशाच्या मंचावर लागलेल्या फ्लेक्सवर घड्याळ चिन्ह गायब आहे. तर दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अद्याप ही संभ्रमावस्था कायम आहे.


इतर महत्वाची बातमी-


Shivaji Adhalrao Patil Join NCP :आढळराव पाटील आज हाताला घड्याळ बांधणार; शिरुरमध्ये घडामोडींना वेग