Pune news : पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सीमेवर असलेल्या औंध जिल्हा रुग्णालयाची जागा ही मोक्याची असल्यानंच या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा पुन्हा एकदा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप काही सामाजिक संस्थांनी केला आहे. औंध जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या अनुषंगानं आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या दालनात एक बैठक झाल्याचा आणि तिथंच खासगीकरणाचा कट रचण्यात आल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे. या रुग्णालयाची तब्बल 85 एकर जागा खाजगी कंपनीच्या घशात घातली जाणार असल्यानं या संस्था आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची तीव्र प्रतिक्रिया उमटली. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनात शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. 


85 एकर जमीन गिळंकृत करण्याचं षडयंत्र


औंध जिल्हा रुग्णालयाचं खासगीकरण करून, रुग्णालयाची 85 एकर जमीन गिळंकृत करण्याचं षडयंत्र सावंतांनी रचल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे संजय मोरे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री हे आरोग्यमंत्री नसून अनारोग्यमंत्री आहेत. क्षय आजारांने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे रुग्णालय नामवंत आहे. या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. याच जिल्हा रुग्णालयाची जागा हडप करण्याच्या तयारीत आरोग्यमंत्री आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. ससून रुग्णालयातील गोळ्यांच्या आणि कंपनीच्या नावांमध्येही गफलत करत असतात, अशा प्रकारचे अज्ञानी आरोग्यमंत्री मंत्रालयात बसले आहेत. त्या ठिकाणी बसून या 85 एकर जागेचं खासगीकरण करण्याचा घाट घालत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.


उपचार महागणार, सर्वसामान्यांचं काय?


संजय मोरे म्हणाले की, औंध जिल्हा रुग्णालय खासगी झालं तर पुण्यातील मध्यमवर्गीय आणि गरिबांना उपचारासाठी वणवण भटकावं लागेल. या रुग्णालयात पुण्यातूनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. स्वस्तात तर कधी मोफत उपचार मिळतील या अपेक्षेने रुग्ण रुग्णालयात दाखल होत असतात. त्यामुळे जर या रुग्णालयाचं खासगीकरण झालं तर अनेक गोरगरिबांना उपचार महाग होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा महागल्या आहेत. खासगी रुग्णालयात सर्वसामान्यांना उपचार घेणं परवडत नाही. त्यामुळे जर या औंध रुग्णालयाचं खासगीकरण झालं तर 300 ते 400 बेडवर उपचार घेणारे रुग्णांच्या उपचाराची किंमत वाढेल शिवाय गुडघ्याचं ऑपरेशन आणि अन्य काही उपचारदेखील महागण्याची शक्यता आहे. खासगीकरण झालं तर गरिबांनी उपचारासाठी जायचं कुठे, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे.