kirit somaiya : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. परंतु, सोमय्या यांच्या विरोधात पुण्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पोलीस ठाण्यात निघालेल्या सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी आज पुण्यात आले आहेत. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या गाडीवर हाताने ठोसे मारले.
सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या जमिनीवर पडले. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीने एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या हे जमिनीवर पडल्यामुळे त्यांना इजा झाली असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलं होतं. कोविड सेंटर सुरू असताना त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापण कारणीभूत असून लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेसला या कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, " कोविड सेंटरच्या कामासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेकडे दुर्लक्ष करण्यात आलं असल्यामुळे रूग्णांचे मृत्यू झाले. लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेस सुजित पाटकर यांची कंपनी आहे. याप्रकरणी सरकार तसेच संबंधित यंत्रणांकडून कामात कसूर झाल्याचे दिसत आहे."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील PMRDA ने हे कंत्राट भ्रष्ट मार्गाने लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला दिले होते. सुजित पाटकर हे या कंपनीचे मालक आहेत. जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासह 3 जणांचे मृत्यू झाले. त्याला लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी आणि सरकार जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे.
सुजित पाटकर आणि PMRDA चे मुख्याधिकारी यांना तत्काळ अटक करण्यात यावे. याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. अजित पवार यांना पुरावे पाहिजे होते, त्यासाठी पुरावे आणले आहेत. अजित पवार यांच्या निगराणीत हे कंत्राट दिले गेले आहे. त्यामुळे त्यांनीही याबाबत स्पष्टीकरण द्यावे. शिवसेनेच्या माफियांसाठी पैशांची उधळपट्टी सुरू आहे. ते लोकांचे जीव वाचवू शकले नाहीत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.
लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे मालक सुजित पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार आहेत. काळ्या यादीत टाकलेल्या या कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आलं, असाही आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
संजय राऊतांच्या परिवाराची वाईन व्यावसायिकासोबत पार्टनरशिप; राऊतांच्या दोन्ही मुली संचालक : किरीट सोमय्या
Kirit Somaiyya : Z Plus Security असताना फोटो काढण्यासाठी परवानगी कुणी दिली? सोमय्यांचा सवाल