पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित तपासामध्ये अनेक वेगवेगळी धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. या प्रकरणातीलआरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार होण्यासाठी वापरलेली थार गाडी ही संकेत चोंधे यांच्या मालकीची होती. विशेष म्हणजे, संकेत चोंधे यांच्या पत्नी धनश्री चोंधे यांनी पती आणि दीराविरोधात छळवणुकीची तक्रार खडक पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याचा गंभीर आरोप चोंधेच्या पत्नीने केला आहे. धनश्री चोंधे यांच्या मते, संकेत चोंधे याच्यावर कारवाई न होण्यामागे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचा हात आहे. त्यांचे राजेंद्र हगवणे, जालिंदर सुपेकर आणि चोंधे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे ही तक्रार दुर्लक्षित करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. आता या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.
जामिनावर बाहेर आहेत आणि प्रमोशन घेऊन सेवेत आले
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, शशिकांत चव्हाण यांची सख्खी बहीण ही जालिंदर सुपेकर यांची पत्नी आहे. थार गाडी मालकाविरोधात चोंधेच्या सुनेच्या खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे, तिथले पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि आणि साथीदार यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल आहे, ते आता जामिनावर बाहेर आहेत आणि प्रमोशन घेऊन सेवेत आले आहेत. चव्हाण विरोधात चाकण पोलीस ठाण्यात चारचाकी गाडीचा गुन्हा दाखल आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या बातम्या आल्या आहेत. अनेकांना त्यांनी त्रास दिला असल्याचं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तर मोक्का कारवाई टाळण्यासाठी 10 लाख मागितले असल्याचं देखील यावेळी अंधारेंनी सांगितलं आहे.
कोटींच्या पुढे फ्लॅट
तर RTI अंतर्गत माहिती मागितली होती त्यात यांच्या पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती मागितली, मात्र ती देण्यात आली नाही. वडील भरत चव्हाण यांच्या नावावर रावेतला जमीन करार नामा आहे. त्यात चव्हाण यांची पत्नी आणि वडील यांचं नाव आहे. रावेत परिसरामध्ये एलिगन्स नावाची मोठी स्कीम आहे, त्यात कोटींच्या पुढे फ्लॅट आहेत. आम्हाला कुणाला व्यक्तिगत टार्गेट करायचे आहे, ना पक्षीय राजकारण करायचे आहे. शशिकांत चव्हाण यांच्य वर झालेले सीडीआर (CDR)चे आरोप हे वैष्णवी हगवणे प्रकरणात लिंक आहे, का ते तपासलं पाहिजे. या सर्व माहितीनुसार गृहमंत्री यांना विनंती आहे, त्याचा इन्कम सोर्स काय आहे, इतकी मोठी मालमत्ता कशी जमवली आहे, ते गरीब लोकांना न्याय देऊ शकतील असा सवाल देखील यावेळी सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
रावेतमधल्या स्कीममधील 1 फ्लॅट 2.5 कोटींचा
अनेक तालुक्यात शशिकांत चव्हाण यांच्या मालमत्ता आहेत. इतकी मालमत्ता असेल तर चोंधेच्या सुनांच्या गुन्ह्यात लक्ष का देत नाही. ह्या लढाईत माझ्यावर दबाव तंत्र येऊ शकते, सर्व मालमत्ता 700 ते 800 कोटींची असण्याची शक्यता आहे. रावेतमधल्या स्कीममधील 1 फ्लॅट 2.5 कोटींचा आहे. हे सगळे लोक वैष्णवी हगवणे प्रकरणात कुठून ना कुठून लिंक आहेत. साधारण पोलीस निरीक्षकाकडे इतकी प्रॉपर्टी येते ते गृहमंत्री यांनी पाहिलं पाहिजे. पोलीस खात्यात आपले नातेवाईक आहेत त्यामुळे काही होत नाही असं हगवणे कुटुंबाला वाटत होतं. सगळ्यांची गृहमंत्री यांनी चौकशी केली पाहिजे. शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हे असताना जामिनावर असताना प्रमोशन होतं, त्यात गृहमंत्री यांनी लक्ष घालावं, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अंधारेंची प्रतिक्रिया
राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, तिकडून राज ठाकरे यांनी भाजपचा हात सोडला की इकडे यांना हात धरायची गरज नाही. दोन भावांनी हातात हात धरले तर कुठले हात हातात घ्यायची गरज नाही. आमच्या पक्ष प्रमुखांनी सांगितलं आहे की, महाराष्ट्र हितासाठी आम्ही छोटे विषय बाजूला ठेऊ.