पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटला दिलेली ही दुसरी भेट आहे. 1 ऑगस्टला देखील शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन कोरोनावरील लस बनवण्याच काम कसं सुरुय याची माहिती घेतली होती. मात्र शरद पवारांच्या या भेटींमुळे त्यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.


मी कोरोनाची कोणतीही लस टोचून घेतलेली नाही. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे बीसीजी इंजेक्शन घेतलं आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं इंजेक्शन घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ही कोरोनाची लस नाही, तर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.


शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटकडून तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या कामाची माहिती घेतली. मी सीरम इन्स्टिट्युटमध्ये जातो कारण पुनावाला माझे मित्र आहेत. तसेच लसीची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय हे समजून घेण्यासाठी मी तिथं गेलो होतो, असं त्यांनी सांगितलं.


उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलेली भूमिका घृणास्पद


उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेबाबत बोलतांना ते म्हणाले की, मला उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेबाबत फारशी माहिती नाही. पण पोलिसांचे वक्तव्य मी ऐकले. पण त्या मुलीची हत्या झाली आणि तिच्या कुटुंबाच्या इच्छेव्यतिरिक्त तिच्यावर अंत्यसंस्कार झाले हे तर खरं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलेली भुमिका ही टोकाची आहे, घृणास्पद आहे आणि तितकीच निंदणीय आहे. राहूल गांधी हे एका मोठ्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना त्याठिकाणी जाऊन द्यायला हवे होते. या प्रकरणाबाबत देशभरात उमटलेली प्रतिक्रिया बरोबर आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.