पुणे: समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करता आले, असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले. काही लोक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, खरा इतिहास काय आहे, तो जगाला माहिती आहे. आमच्यादृष्टीने राजमाता जिजाबाई याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मार्गदर्शक होत्या, असे शरद पवार यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
योगी आदित्यनाथ हे रविवारी आळंदीत आले होते. यावेळी त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांना पुढील कार्य करता आले, असे त्यांनी म्हटले. याविषयी शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, आमच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामध्ये राजमाता जिजामात यांचे योगदान आहे. जिजाबाईंनीच शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा दिली. पण जिजाबाईंनी केलेले कर्तृत्त्व बाजुला सारुन त्याचे श्रेय आणखी कोणाला देण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. पण शिवाजी महाराजांचं स्वत:चं कर्तृत्व, जिजाबाईंचे मार्गदर्शन यामुळे सगळा इतिहास घडला, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
बारामतीची प्रतिष्ठा कोणी वाढवली, हे सगळ्यांना माहिती आहे; शरद पवारांचं अजितदादांना प्रत्युत्तर
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये एक वक्तव्य केले होते. आता काही लोक येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचे आवाहन करतील. या आवाहनाला भुलू नका, असे अजितदादांनी म्हटले होते. याविषयी विचारणा केली असता शरद पवार प्रथम हसले. यानंतर त्यांनी म्हटले की, चांगली गोष्ट आहे. पण मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही, हे मी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये भावनिक आवाहन करण्याचे कारण नाही. बारामतीचे लोक शहाणे आणि समंजस आहेत. वर्षानुवर्षे कोणी काम केले आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली, हे बारामतीकरांनी पाहिले आहे. ते योग्य निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
राज्याच्या विकासासाठी पक्ष सोडला म्हणणाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नाही; शरद पवारांचा अजितदादांना टोला