सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही : शरद पवार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 25 Jun 2017 02:14 PM (IST)
पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नसली, तरी सरकारच्या या पहिल्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. आज पुण्यात वार्ताहर संमेलनात ते पत्रकारांशी बोलत होते. कोणत्याच मागण्या एकाचवेळी पूर्ण होत नसता, त्यामुळे उर्वरित मागण्यांसाठी आम्ही भविष्यात आग्रह धरु असे सूचक विधानही त्यांनी केलं. शिवाय कर्जमाफी हे एक पाऊल होतं. आता यापुढे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचं, त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय ग्रामीण सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे दोन हजार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा आहे. त्यामुळे त्या जमा करुन घेण्यासठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर कर्जमाफीची मर्यादा ही एक लाखावरून दीड लाखांवर नेली होती. त्यामुळे राज्यातल्या 40 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा दावा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.