Baramati Diwali Padwa : राज्यभरात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र दिवाळी साजरी करण्याची पवार कुटुंबियांची परंपरा आज बदलली गेली. बारामतीमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वेगळा आणि शरद पवारांचा वेगळा पाडवा उत्सव पार पडला. शरद पवारांचा पाडवा गोविंद बागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. पक्षफुटीनंतर दोन गट पडलेच पण त्यानंतर आता पाडवा देखील वेगळा घेण्यात आला. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाते अध्यक्ष शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. अनेक वर्षापासून चालत आलेली एकत्रित पाडव्याची साजरा करण्याची पद्धत कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. अजित पवार सोडले तर बाकी सर्व गोविंद बागेत उपस्थित होते. त्यांच्या भगिनी देखील याठिकाणी आल्या होत्या. त्यांचे बंधू असतात. अजित पवार यांना वेळ मिळाला नसेल. पण बाकीचे सर्व आले असल्याचं, शरद पवार यांनी बोलताना सांगितलं आहे.


नेमकं काय म्हणाले?


दोन ठिकाणी पाडवा व्हायला नको अशी लोकांची भावना आहे. चांगली गोष्ट आहे. मला आनंद आहे. कार्यकर्त्यांची भावना आहे. अनेक वर्षाची परंपरा आहे. पाडवा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. या प्रांगणामध्ये आम्ही सर्वजण जमतो आणि ही जुनी पद्धत आहे. ही कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. पण ठिक आहे. लोकांना डबल ठिकाणी जावं लागलं. त्यांना त्याचा त्रास झाला. त्यामुळे मी अस्वस्थ आहे, असंही शरद पवार म्हणालेत.


आमच्या कुटुंबातील सर्व लोक पाडव्याच्या आदल्या दिवशी येतात. काल सर्व होते. अजितदादा काही कामामुळे आले नसतील. त्यांना वेळ मिळाला नसेल. पण सर्व होते. त्यांच्या दोन बहिणी इथेच होत्या. बंधु तर इथंच होते, बाकी सगळे जण होते. काही काही वेळा कामामुळे माझ्याकडूनही उशीर व्हायचा. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक आले. नागपूर, बुलढाणा, गडचिरोली, कोकणातील मुंबई, मराठवाड्यातील अनेक लोक भेटले. राज्याच्या अनेक तालुका आणि जिल्ह्यातील लोक आले. यावेळी नेहमी पेक्षा अधिक लोक आले, असं शरद पवारांनी म्हटलं. बारामतीमध्ये दरवर्षी पवार कुटुंबिय सकाळी एकत्र जमतात. दिवाळीच्या पाडवा उत्साह गोविंद बागेत साजरी होत होती. परंतु यंदा प्रथमच शरद पवार यांची दिवाळी गोविंद बागेत पाडवा साजरा झाला तर अजित पवार यांची दिवाळी काटेवाडीत साजरी झाली. त्यावर शरद पवार बोलत होते. 


अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं वक्तव्य 


अजित पवारांच्या आर.आर. पाटलांवर केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख आम्ही कोणी केलेला नव्हता. हा मुद्दा कोणी काढला हे सांगायची गरज नाही. पण एकाच गोष्टीचं वाईच वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत स्वच्छ व्यक्तीमत्व म्हणून ज्यांचं नावलौकीक होतं. अशा स्वच्छ, राजकारणी आणि नेत्याबद्दल त्यांच्या पश्चात्य उलटी-सुलटी चर्चा होणं हो अशोभनीय आहे. हे घडलं नसतं तर आंनद झाला असता. जी व्यक्ती जाऊन नऊ नर्ष झाली आणि त्यांचा लौकिक संपुर्ण देशामध्ये एक अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक नेता त्यांच्यासंबधी अशी चर्चा होणं हे योग्य नाही. पण, ठिक आहे, सत्ता हातात असल्यानंतर आपण काही बोलायला मुक्त आहोत. हा समज काही लोकांचा असतो. कदाचित त्याचाच हा एक भाग असेल असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे.