MPSC Pune Sharad Pawar पुणे: आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे राजकीय पडसाद देखील उमटत आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंती केली असून आज महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. 


राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काल आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील ट्विट करत लवकरच तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, असं शरद पवारांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. 






देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. 


अनेकांच्या सूचनांकडे एमपीएससीचे दुर्लक्ष-


आयबीपीएस परीक्षेला राज्यातून लाखो विद्यार्थी बसतात. त्यामुळे राज्यसेवा परीक्षेची तारीख बदलावी अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत होती. त्यासाठी अनेक आमदार, लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारला पत्रही लिहिलंय. तर या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनीही आयोगाच्या अध्यक्षांना काही सूचना दिल्या होत्या अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तरीही एमपीएससीने त्यावर कोणताही विचार केलेला दिसत नाही. एमपीएससीच्या परीक्षा या नियोजित तारखेलाच होतील असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. 


एमपीएससीचा भोंगळ कारभार कायम-


आधीच दोन वेळा एमपीएससीने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली आहे. आता तिसऱ्यांदा परीक्षेची तारीख जाहीर करताना त्या दिवशी इतर कोणत्या परीक्षा नियोजित आहेत की नाही हे पाहण्याची तसदीही घेतल्याचं दिसत नाही. या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या अनेक संघटनांनी आवाज उठवला, अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावरून प्रश्न मांडला. पण एमपीएससी असो वा राज्य सरकार, विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही.


संबंधित व्हिडीओ-