पुणे : एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार निलंबित करण्यासाठी शरद पवार गट (Sharad Pawar Group) आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) शरद पवार गट दोन हात करायला सज्ज झाला आहे. यासाठीच शरद पवारांच्या गटाने पिंपरी-चिंचवड स्वतंत्र कार्यालय थाटले आहे. काळेवाडी परिसरात हे कार्यालय उभारलं आहे. लवकरच या कार्यालयाचे उद्घाटन केलं जाईल.


शरद पवार गटाच्या या कार्यालयात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्समधून अजित पवारांचा फोटो वगळण्यात आला आहे. शरद पवार आणि जयंत पाटलांचा फोटो लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हे कार्यालयात उभारण्यात आलं आहे. या कार्यालयामुळे पुन्हा एकदा शरद पवार गटाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं वर्चस्व आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनेक नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी पाठिंबा दर्शवला आहे. हे सगळं पाहून आता शरद पवार गटाने देखील कार्यालय उभारलं आहे.


3 जुलैला शरद पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की, तुम्ही तीन महिन्यांमध्ये मुख्य राष्ट्रवादीत परत या. अनेक कार्यकर्त्यांना शरद पवारांनी डेडलाईनही दिली होती. आता शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेली डेडलाईन संपत आली. सर्व कार्यकर्त्यांसाठी शरद पवार राबले, याचा सन्मान ठेवून कार्यकर्ते परत येतील असं वाटलं होतं. मात्र एकही कार्यकर्ता परत आला नाही, हे दुर्दैव आहे. त्यानंतर शहरातील मूळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे कार्यालय उभारलं आहे आणि याच कार्यालयातून आता राष्ट्रवादीचं पुढचं कार्य चालणार आहे, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितलं आहे. 


कोणाच्या हस्ते होणार उद्घाटन?


जयदेव गायकवाड यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर आमदार रोहित पवारही पिंपरी-चिंचवडच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटून गेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे फोनवरुन आमच्याशी संपर्कात आहेत. त्यामुळे जयंत पाटील आणि शरद पवार हे या कार्यालयाच्या उद्घाटनाला येऊ शकतात, असंही सांगण्यात आलं आहे. मात्र या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आता शरद पवारांसोबत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी फळी उपस्थित राहते का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


हेही वाचा


Ajit Pawar : गुजरातला जाणारं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याचा विचार, मराठवाड्याला चालना देणारे निर्णय घेणार : अजित पवार