पुणेबदलापूरमध्ये झालेल्या आंदोलनावरती सत्ताधारी पक्षांनी टीका केली होती. तर ते राजकीय हेतूने प्रेरित होतं असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. त्यांच्या या आरोपांवर आज शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बदलापूरात झालेलं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला त्यावर शरद पवार (Sharad Pawar) बोलताना म्हणाले, त्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. आम्ही कोणीच तिथे गेलेलो नव्हतो. कोणत्याही राजकीय पक्षाने असा प्रकार झाल्यानंतर राजकीय टीका-टिप्पणी करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्री असं बोलले नसते तर बरं झालं असतं, यामध्ये कोणीही राजकारण आणलं नाही, आमच्या मनात देखील असंही नाही. हा केवळ बालिकांवरील अत्याचाराबाबतच्या तीव्र भावना व्यक्त करणारं आहे. त्याकडे वेगळ्या अँगलने बघू नये, त्या बालिकांवर झालेल्या या घटनेनंतर कोणीही त्याचं राजकारण करू नये असं मला वाटतं असंही शरद पवार(Sharad Pawar) पुढे म्हणाले आहेत. 


प्रत्येक घटकाने बंदमध्ये शांततेत सहभागी व्हावं...


प्रत्येक घटकाने बंदमध्ये शांततेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. लोकांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उद्याच्या बंदचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील जनता उद्याच्या बंदमध्ये सहभागी होतील. त्यामुळे एक जनमत तयार होईल, बदलापुरातील घटनेबाबत जनभावना व्यक्त करण्यासाठी बंद असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. बदलापुरातील जनतेने शांततेने आंदोलन केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य नाही, राज्य सरकारने अधिक संवेदनशील व्हावे आणि सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावे, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.


आंदोलकांवरील गुन्हे दाखल करणं या गोष्टी योग्य नाहीत...


याप्रकरणी राज्य सरकारने संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. या घटनेवर लोकांची रिअॅक्शन समोर आली आहे, त्या रिअॅक्शनमुळे ते सर्वजण एकत्रित आले. त्यांनी आपल्या संतप्त भावना त्या ठिकाणी शांततेत व्यक्त केल्या. त्यामुळे त्यांच्यावर खटले भरणं, गुन्हे दाखल करणं या गोष्टी योग्य नाहीत. राज्य सरकारने आणि गृहखात्याने याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहणं गरजेचं आहे. बदलापुरातील घटनेनंतर कडक कारवाई करण्याची गरज आहे. राज्यभरात मुलींवर अत्याचार वाढले आहेत, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. उद्याच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.