पुणे : राजकीय पैलवानांना धोबीपछाड देणारे, राजकीय कुस्त्या लावण्यात पटाईत आणि कसलेला पैलवान अशी ख्याती असलेले शरद पवार आज खरोखरच्या कुस्तीच्या आखाड्यात उतरले. निमित्त होतं महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढाईचं.

शरद पवार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार स्पर्धेला हजर होते. स्पर्धेआधी विजय चौधरी आणि अभिजित कटके या दोघांच्याही पाठीवर पवारांनी शुभेच्छांची थाप दिली.

कुस्ती स्पर्धा संपल्यानंतर विजेता पैलवान विजय चौधरीचं कौतुक करण्यासाठीही शरद पवार पुन्हा आखाड्यात आले. तुफान गर्दी असतानाही पवारांनी आखाड्यात येणं टाळलं नाही. विजेता पैलवन विजय चौधरी आणि अंतिम लढतीत पराभूत झालेला अभिजित कटके या दोघांनाही पवारांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातल्या वारजे गावात झालेल्या स्पर्धेत  विजय चौधरीनं अभिजित कटकेवर मात करुन सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलण्याचा मान मिळवला. या विजयासहच विजय चौधरीनं नरसिंग यादवच्या सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या विक्रमाशीही बरोबरी साधली.