पुणे : शरद मोहोळ (Sharad Mohol) प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पाठलाग करुन शिरवळजवळ त्याला ताब्यात घेतलं. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असं या आरोपीचं नाव आहे. या आरोपींकडून 3 पिस्तूल जप्त करण्यात आलेत. ज्या पिस्तूलमधून शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता, ती पिस्तूल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या आरोपींकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या दोन दुचाकी देखील ताब्यात घेतल्या. प्राथमिक माहितीनुसार, यातील काजी या आरोपीचे शरद मोहोळशी जमिनीवरुन आणि आर्थिक गोष्टीवरुन वाद झाले होते. त्याताच सूड घेण्यासाठी शरद मोहोळ याला मारण्याचा कट रचण्यात आला होता.
साहिल पोळेकर हा पळून जात असताना शिरवळमधून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. शरद मोहोळ प्रकरणात सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई करण्यात आली. शरद मोहोळ प्रकरणाती एका आरोपीचं नाव सुरुवातीला निष्पन्न झालं होतं. त्यानंतर सात जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
15 गुन्ह्यांमध्ये अट्टल गुन्हेगार
शरद मोहोळ हा सुमारे 15 गंभीर गुन्ह्यांमध्ये अट्टल दहशतवादी गुंड म्हणून ओळखला जातो. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी 2010 मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
कोण होता शरद मोहोळ? (who is Sharad Mohol)
ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारीची जगताची ओळख झाली, त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ काम करत होता. मात्र, याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला. शरदचे आई वडिल शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊनही गुन्हेगारीकडे वळला होता.