Mumbai Pune Expressway :  पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai-pune Expressway ) अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण, लेन कटिंग टाळणे, अवजड वाहनांनी नियम पाळणे या बाबींकडे लक्ष देण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी दिली. विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना ते बोलत होते.


रस्ते सुरक्षेसंदर्भात सुधारित धोरण यापूर्वीच तयार करण्यात आले आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस, महामार्ग पोलिस, राष्ट्रीय रस्ते विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 17  ऑक्टोबर 2022 रोजी बैठक घेऊन यंत्रणेला यासंदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती परिवहन मंत्री  शंभूराज देसाई यांनी दिली.


या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत त्यामुळे सन २०१६ पासून अपघात संख्या आणि अपघातामुळे होणारे मृत्यू यात घट होत असल्याचे दिसून येत आहे. स्पीड गनची संख्या वाढवणे, अवजड वाहने डाव्या मार्गिके मधूनच जातील याकडे लक्ष देणे याबाबत परिवहन विभाग आणि महामार्ग पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अधिक सुरक्षित प्रवासासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या केल्या जातील, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.


अपघात कमी करण्यासाठी अॅक्शन प्लॅन
मुंबई-पुणे द्रुतगती नवीन व जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी 1 डिसेंबर पासून पुढील 6  महिन्यांसाठी 24 तास ‘सुरक्षा’ या रस्ता सुरक्षा जनजागृती आणि अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत करण्यात आलं आहे. 


24 तास सुरक्षा पथकं तैनात


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 17 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत रस्त्यावरील अपघात टाळण्यायाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच प्रमाणे जुन्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करणे आणि वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरीता दीर्घकालीन जनजागृती आणि अंमलबजावणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले होते. त्यानुसार परिवहन विभागाने सुरक्षा मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांची एकूण 12 पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्या प्रत्येक पथकात 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही महामार्गावर यामधील प्रत्येकी 6 पथके आणि 15 अधिकारी 24 तास कार्यरत आहेत.