पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये 21 वर्षीय प्रतीक पाष्टे तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. प्रतिक इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गेला होता. काम करत असताना अचानक आग लागली आणि त्या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला.


पुण्यातील प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक 14 मध्ये प्रतिक आई वडील आणि छोट्या भावासोबत राहत होता. त्याचे वडील रुग्णालयात अॅडमिट आहेत. हातावर पोट असणारे हे कुटुंब आहे. छोटा भाऊ पंधरा वर्षाचा आहे. तर त्याच्या आईचा प्रभात रस्त्यावरच चहाचा स्टॉल आहे. प्रतीकने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण करून कामाला सुरुवात केली होती. आपल्या कुटुंबाचा तो आधार बनू पाहत होता, परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. काम करत त्याला शिक्षणाला सुरुवात केली होती. पुण्यातील महाविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केले होते. नुकताच कोर्स संपला होता. गुरुवारी दुपारी तो महेंद्र इंगळे आपल्या वरिष्ठ सहकाऱ्या सोबत सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही.


सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत सीरम इन्स्टिट्यूटकडून जाहीर करण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करत आहोत, असं सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावला यांनी म्हटले आहे.