पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने तिरंगा ध्वजासोबत छायाचित्रे अपलोड करण्याचा विश्वविक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे. राष्ट्रध्वजासोबत एक लाख पन्नास हजार फोटोंचा संग्रह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवण्याची मोहिम सोमवारी यशस्वी पार पडली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठने नवा इतिहास घडविला आहे. मागील दोन वर्षात हा दुसरा विश्वविक्रम आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ' हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात आला त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दीड लाख फोटो राष्ट्रध्वजासोबत काढत जागतिक गिनीज बुक मध्ये विश्वविक्रम नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत एक लाख पन्नास हजार फोटोंचा संग्रह करण्यात आला आहे. याला महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून अशा प्रकारचा रेकॉर्ड करू पाहणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात दुपारी हा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे तसेच हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांनी विद्यापीठाच्या विश्वविक्रमाची घोषणा केली.
कोश्यारी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यढ्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीकारकांनी केवळ इंग्रजांना देशातून घालवण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवणे एवढ्याच उद्देशाने नव्हे तर निरोगी भारत, स्वच्छ भारत, शिक्षित भारत, समृद्ध भारत व्हावा या भावनेतून त्याग आणि बलिदान दिले. या उद्देशांच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारमार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरे करण्याचे शासकीय स्वरुप बदलून हा कार्यक्रम जनतेचा उत्सव व्हावा असे प्रयत्न आहेत. आगामी 25 वर्षे हा उत्सव देशातील जनता स्वयंस्फूर्तीने साजरा करील. . हा उत्सव केवळ सरकारी नसेल तर जनेतचा उत्सव असेल.