SPPU Pune News:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ऑक्सफर्ड ऑफ इस्ट म्हटलं जातं. विद्यापीठाला महाराष्ट्रात अनेक गोष्टींमुळे अव्वल स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत विद्यापीठ पुढे असतं. यावर्षी  ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ यांच्या रॅंकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बाराव्या क्रमांकावर आहे.  केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कद्वारे दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. त्यात यावर्षी पुणे विद्यापीठ बाराव्या क्रमांकावर आहे. 2022 ची क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केली.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अव्वल स्थानावर आहे आणि देशात आघाडीवर असलेले हे राज्यातील पहिले सार्वजनिक विद्यापीठ आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठला या क्रमवारीत एकूण 59.48 गुण आहेत जे मागील वर्षी 58.34 होते. 2020 आणि 2021 मध्ये महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट असूनही पुणे विद्यापीठाने संशोधनाची गुणवत्ता, उद्योग आणि शैक्षणिक सहकार्य, विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी तसंच सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.


“एकंदर क्रमवारीत आम्ही बाराव्या स्थानावर असलो तरी सार्वजनिक विद्यापीठ स्तरावर आमचा दुसरा क्रमांक असला तरी राज्यात पहिला क्रमांक पूर्वीसारखाच आहे. कोरोनाने राज्याबाहेरील आणि परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी केल्यामुळे, विद्यार्थी-शिक्षक गुण बदलले आहे त्यामुळे एकूण गुणांमध्ये फरक आहे. पण मला आशा आहे की आम्ही आणखी पुढे जाऊन भविष्यात आणखी चांगले काम करू शकू,”, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे यांनी सांगितले.


केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नेशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) म्हणजेच देशभरातील शैक्षणिक संस्थां, विद्यापीठांची शुक्रवारी रँकिंग जारी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईने देशात सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावर होती. राज्यातील एकूण 12 शैक्षणिक संस्थांनी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलं आहे. दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून हे रँकिंग जाहीर केले जाते.