SPPU News: पुणे विद्यापीठ ( Pune University ) मागील 24 तासांपासून अंधारात आहे. विद्यापीठात 24 तास झाले बत्ती गुल झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील दोन तासात वीज पुरवठा पूर्ववत झाला नाही तर आंदोलन करु असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
गेले 24 तास विद्यापीठात विद्यार्थ्यांना ब्लॅकआउटच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात राजकीय नेते मंडळी हजर राहणार होती. त्यात खासदार सुप्रिया सुळे, भाजपनेत्या चित्रा वाघ यांचा समावेश होता. यांच्या कार्यक्रमासाठी विद्यापीठाने विजेची सोय केली होती. जनरेटर लावत या कार्यक्रमाला वीजपुरवठा करण्यात आला होता. नेत्यांसाठी वीज पुरवठा करता येतो मग आम्हाला रात्रभर अंधारात का ठेवलं, असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
फी घेताना दिलेली आश्वासनं फोल
विद्यापीठात प्रवेश घेताना वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगळी फी आकारली जाते. त्यात अनेक वसतीगृह, ग्रंथालयाचा समावेश असतो. प्रवेश घेत असताना मात्र वीजेपासून सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातील अशी आश्वासनं विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र विद्यापीठात आल्यावर वेगळी परिस्थिती बघायला मिळते. त्यामुळे फुकटची फी देत नाही तर वडिलांनी कष्टाने कमावलेल्या पैशांनी आम्ही फी भरतो. त्यामुळे आम्हाला योग्य सुविधा दिल्याच पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
समस्या सोडवण्याकडे विद्यापीठाचं दुर्लक्ष
मागील 24 तासांपासून विद्यापीठातील विद्यार्थी अंधारात आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यासावर याचा परिणाम झाला आहे. रात्रभर अनेक विद्यार्थी उशीरापर्यंत अभ्यास करतात. मात्र वीज नसल्याने त्यांना अभ्यासाबरोबरच अनेक समस्यांना समोरं जावं लागलं आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: एमएससीबीला या संदर्भात वारंवार माहिती दिली मात्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे.
आंदोलनाचा इशारा
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कधी फी वाढी विरोधात तर कधी इतर समस्यांसाठी आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो. अनेकदा विद्यार्थी भर पावसात आंदोलन करतात. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन जागं होतं विद्यार्थ्यांच्या समस्येचं निवारण करताना दिसतात. दरवेळी विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी आंदोनल करावं लागतं त्यामुळे अनेकदा विद्यार्थी संतापलेले असतात. यावेळी देखील योग्य फी भरूनदेखील विद्यार्थ्यांना 24 तास अंधारात रहावं लागलं. जर काही वेळात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर यावेळीदेखील विद्यार्थ्यांनी तीव्र भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे.