पुणे : सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सिनेमाचा सेट सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानातून  हटवण्याचा आदेश विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिला आहे. सेट हटवण्यासाठी मंजुळेंना सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

‘झुंड’ या आगामी हिंदी सिनेमाच्या चित्रिकरणासाठी नागराज मंजुळेंनी पुणे विद्यापीठाचं मैदान भाड्याने घेतलं होतं. या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन असणार आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या तारखांमुळे नागराज मंजुळेंच्या सिनेमाच्या चित्रिकरणाचा अवधी वाढत जात होता.

सिनेमाच्या चित्रिकरणासाठी मैदान भाड्याने देऊन लीजच्या कराराचा भंग केल्याचा ठपका पुणे शहर तहसील कार्यालयाने विद्यापीठावर ठेवला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठावर कारवाईचे संकेत दिले होते.

हा सिनेमा खेळावर आधारित असल्याने विद्यापीठाकडून त्याचा सहानभूतीपूर्वक विचार करण्यात आला होता व त्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र कारवाईच्या भीतीने आता सेट हटवण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आले आहेत.

संपूर्ण हिवाळ्यात मैदानावर सेट असल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान, तर नागरिकांना व्यायामासाठी जागा मिळाली नाही. आमची हक्काची जागा आम्हाला परत कधी मिळणार, असा सवाल विद्यार्थी विचारत होते.

संबंधित बातमी : नागराज मंजुळेंमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर कारवाई होणार?