Pune Sppu News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘डिग्री प्लस’ (Degree Plus Course) या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली होती. मात्र या ‘डिग्री प्लस’ अभ्यासक्रमाकडे विद्यार्थांनी पाठ फिरवल्याचं चित्र होतं. मात्र आता या कोर्समध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे आणि येत्या काळात विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यातील संधी आणि भविष्यात होणारा या अभ्यासक्रमाचा उपयोग पाहता विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करुन दिली होती.
पदवीचं शिक्षण घेत असताना औद्योगिक शिक्षणाचा अभ्यास करता यावा यासाठी हा कोर्स तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत विशेष शिक्षण देणारे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये AWS Academy, EDX, Simpli Learn, eKeeda, Celebrity School, Catalyst Wealth आणि अनेकांचा समावेश आहे, जे SPPU विद्यार्थ्यांना अतिशय सवलतीच्या दरात आणि काही शुल्काशिवाय अभ्यासक्रम देत आहेत. त्यामुळे या कोर्सला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असं आवाहन विद्यापीठाकडून केलं जात आहे.
कमी खर्चात असून विद्यार्थ्यांनी फिरवली होती पाठ
हे सगळे अभ्यासक्रम बाहेर प्रचंड खर्चाचे आहेत. मात्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या प्रकारचे अभ्यासक्रम शिकता यावेत यासाठी विद्यापीठाने हा अभ्यासक्रम सुरु केला होता. मात्र तरीही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाबाबत गांभीर्य नसल्याचं चित्र समोर आलं होतं. या अभ्यासक्रमाची गुणपत्रिकेत नोंद होत नाही. तर हा अभ्यासक्रम का करायचा, असा मानस विद्यार्थ्यांचा तयार झाला होता. मात्र येत्या काळातील संधी पाहता विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
प्रवेश प्रक्रिया काय आहे?
http://degreeplus.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. यात विद्यार्थी माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड संगणन, उत्पादन व्यवसाय, मीडिया, संस्कृती, अर्थशास्त्र, उद्योजकता या अभ्यासक्रमांचा अभ्यास करु शकतील. सुरुवातीला हे अभ्यासक्रम केवळ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनाच उपलब्ध असतील. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून माहिती भरावी. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्राचा उल्लेख करू शकता. सेलिब्रेटी स्कूलद्वारे काही अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. सेलिब्रिटी स्कूल अंतर्गत नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनय, आशा भोसले गायन, मधुर भांडारकर चित्रपट दिग्दर्शन, साबिरा मर्चंट कम्युनिकेशन स्किल्स, डब्बू रतनानी फोटोग्राफी आणि मीडिया क्षेत्रात बरेच काही अभ्यासक्रम ऑफर करत आहेत.