Pune Vijay Mane News: राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासारखा हुबेहुब दिसणाऱ्या विजय माने यांनी हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली होती. पुण्यात त्याच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत विजय माने यांनी (Vijay Mane) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मी मुख्यमंत्र्यांसारखा दिसतो यात माझी चूक काय? असं म्हणत त्यांनी कोर्टात दाद मागितली आहे. हे प्रकरण पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. या संदर्भात पोलिसांना नोटीस जारी केली आहे.
या प्रकरणावर पुणे पोलिसांनी 18 ऑक्टोबरपर्यंत आपलं उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कोर्टाने हे निर्देश दिले आहे. मात्र यावर आता पुणे पोलिस काय करणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
'मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत आहे'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखीच वेशभूषा, दाढी आणि कपडे परिधान करून हुबेहुब सीएम एकनाथ शिंदे बनून फिरणाऱ्या विजय माने यांचा फोटो सराईत गुन्हेगारासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती घेतली असता पोलिसांना एक फोटो मिळाला. त्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचं दिसत होतं. यावरुन राजकीय वातावरण पेटलं होतं. विजय माने यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत आहे, असं शिंदे समर्थकांचं म्हणणं आहे.
याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांचं रूप घेऊन फसवल्याच्या आरोपात विजय नंदकुमार मानेविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेनं कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) या कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका माने यांनी अॅड. असिम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली होती.
पोलिसांनी विजय माने याच्याविरोधात केलेली कारवाई अत्यंत उत्साहाच्या भरात केलेली, चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी पार पडली आणि यावर आता पुणे पोलिसांना कोर्टानं उत्तर मागितलं आहे.