पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात झालेल्या ड्रग्स तस्करी आणि (sasoon hospital drug racket) आरोपी पलायन प्रकरणी अखेर आज ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आरोपी रुग्ण त्यांची आर्थिक परिस्थिती आणि आमच्या डॉक्टरांच्या काहीही एक संबंध नसून, जेल प्रशासन जे रुग्ण आमच्याकडे पाठवतो त्याच्यावर ट्रीटमेंट करणे हे वर्षानुवर्ष सुरू आहे. अनेक वेळा या आरोपी रुग्णांना गरज नसल्यास आम्ही फक्त चेकअप करून परत देखील पाठवलं असून केवळ रुग्णांना बरं करणं हेच आमचं काम असल्याचं संजीव ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.
रुग्ण बरा झाल्यावरच आम्ही त्याला डिस्चार्ज देतो. सद्यस्थितीला वार्ड क्रमांक 16 मध्ये सात रुग्ण असून त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू असल्याचा देखील संजीव ठाकूर यांनी सांगितल आहे. जेल प्रशासनाकडून जे पत्र येतं त्या पत्रात ते फक्त रुग्णाबद्दल माहिती मागतात डिस्चार्ज बद्दल ते सांगत नाहीत. आम्ही वेळोवेळी जेल प्रशासनाला याची माहिती देतोच पण माननीय कोर्टाकडून माहिती मागवल्यास संबंधित डॉक्टर त्या रुग्णाबद्दल संपूर्ण माहिती न्यायालयाला देखील पुरवतात, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
विभागीय आयुक्तांकडून ससूनची पाहणी
त्यासोबतच ससून रुग्णालयात झालेल्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. नांदेड मध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ससून रुग्णालयाला भेट दिली. आरोग्य सामग्री आणि एखादी आपत्कालीन घटना घडली तर त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे का? हे पाहण्यासाठी या दोघांनी आज ससून रुग्णालयात भेट देऊन अधिष्ठाता डी संजीव ठाकूर यांच्यासोबत बैठक घेतली. ज्या वार्ड क्रमांक 16 मध्ये कैदी उपचार घेतात त्या वार्डची सुद्धा पाहणी केली. ससूनमध्ये अपुरे मनुष्यबळ असून लवकरात लवकर भर्ती बाबत देखील योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच ससून रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा कशी आहे?, याचा अहवाल राज्य सरकारला सोमवारपर्यंत देण्यात येईल अशी माहिती देखील राव यांनी दिली.
रुग्णालयात दाखल होणारी रुग्णसंख्या, रुग्णालयातील वैद्यकीय, नर्सिंग तसेच अन्य मनुष्यबळाचा आढावा घेतला. रुग्णालयातील औषध साठा तसेच औषध खरेदीच्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाहीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री यांनी स्थानिक स्तरावर औषध खरेदी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगून रुग्णालयाला अत्यावश्यक व जीवनरक्षक औषधांच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देता येईल, असेही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-