पुणे : बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुख यांच खून करण्यात आला होता. याप्रकरणी, आरोपी वाल्मिक कराडसह 7 जणांना अटक करण्यात आली असून अद्यापही एक आरोपी फरार आहे. आपल्या भावाला न्याय मिळावा, वडिलांना न्याय मिळावा म्हणून धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी विविध जिल्ह्यात जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. तर, नुकतेच पुण्यात (Pune) हुंड्यासाठी छळ केल्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेल्या वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi hagwane) घरी जाऊन धनंजय देशमुख आणि वैभवीने सांत्वन केलं. धनंजय देशमुख यांनी वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांच्यासमवेत कायदेशीर प्रक्रियेने ही लढाई लढण्याच्या अनुषंगाने चर्चा केल्याचे समजते.

संतोष देशमुख यांचे कुटुंबीय बीडमधून भरपावसात पुण्यातील अनिल कस्पटे यांच्या घरी भेटीसाठी पोहोचले. हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्यामुळे आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या माहेरी कस्पटें कुटुंबीयांना सांत्वनपर भेटण्यासाठी देशमुख कुटुंबीय आले होते. यावेळी, धनंजय देशमुख यांनी अनिल कस्पटेंसोबत घडलेल्या घटनेसंदर्भाने चर्चा केली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून पुण्यातही जोरदार पाऊस पडत आहे. या भरपावसात देशमुख कुटुंबीयांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांचे सुपुत्र विराज देशमुखही येथे भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळालं. 

वैष्णवीची गळफास घेऊन आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय वर्षे 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. तर, फरार असलेला सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांनाही 3 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. या प्रकरणानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे, तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला आहे. वैष्णवीप्रमाणेच तिच्या मोठ्या जावेचा देखील हगवणे परिवार छळ करत असल्याची मारहाण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पुण्यात सकाळपासूनच पाऊस

पुणे शहरासह घाटमाथ्यावर आज सकाळपासूनच जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. त्यानुसार, पुणे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. पुढील 3 ते 4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

मुंबईतील भुयारी मेट्रोची वाताहात, प्रशासनाची मुजोरी, सत्यस्थिती दाखवण्यास मज्जाव, वरळी आचार्य अत्रे स्टेशन पाण्यात!