पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. 


बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटूंबाने आंदोलने केली. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. हा मुद्दा बीडच्या खासदारांनी दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशनावेळी मांडला. त्याचबरोबर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. 


राजकीय आरोप प्रत्यारोप अन् मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं म्हटलं होतं. या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटनर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव आलं, त्यांना राजकीय संरक्षण असल्याचा दावा देखील अनेक नेत्यांनी केला होता, त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले, तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, असं म्हटलं होतं.


दरम्यानच्या काळात वाल्मिक कराड यांची पत्नी आणि त्यांच्या संपर्कातील काही जणांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. तर काहींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली. काही आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात आली, कराड फरार असताना त्याच्या पत्नीची देखील चौकशी झाल्याची माहिती आहे. 


तर मी शिक्षा भोगायला तयार - वाल्मिक कराड


मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


सुरेश धस यांच्यासह सत्ताधारी, विरोधकांनी मुद्दा उचलून धरला


बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झालेले भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या गुन्हेगारीवरती बोट ठेवलं. त्यांनी हे प्रकरण सुरवातीपासून लावून धरलं होतं, तर त्यानी हिवाळी अधिवेशनावेळी देखील आपली मते आक्रमकपणे मांडली होती. तर वाल्मिक कराडला वाल्मिक अण्णा म्हणून बीड तालुक्यामध्ये ओळखले जाते. मात्र वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानदेखील हालत नाही’, हे विधान स्वत: पंकजा मुंडे यांनी एका भाषणात केले होते. भाजप आमदार सुरेश धसही जाहीरपणे बोलले आहेत. 


कराडच्या आत्मसमर्पणावर काय म्हणाली वैभवी देशमुख?


"माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, इतके दिवस झाले पोलीस यंत्रणा काम करते आहे. पण त्यांना इतका वेळ का लागत आहे, ते गुन्हेगार असतील तर ते स्वतः सरेंडर होत आहेत. तर मग इतके दिवस पोलीस यंत्रणा काय करत आहे. त्यांना पकडण्यासाठी इतका वेळ लागत असेल तर, आम्ही न्यायाच्या पेक्षा कधी करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार माझी एकच मागणी आहे. ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या केली. जे तीन आरोपी फरार आहेत, लवकरात लवकर अटक करावी नुसार आणखी ज्या आरोपी आहेत, त्यांनाही ताब्यात घ्यावं, कारवाई करावी आणि  माझ्या वडिलांना आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे असे वैभवीने पुढे म्हटलं आहे.


तर हा पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करणारा -  सुषमा अंधारे


शरण येणं किंवा आत्मसमर्पण करणे हा शब्दप्रयोग प्रसारमाध्यमे वापरत आहेत. या कृतीला आत्मसमर्पण हा शब्दप्रयोग होत असेल तर हा पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करणार आहे. कारण ज्या प्रकरणाने अधिवेशन गाजवलं होतं, असंख्य आमदारांनी यावर भाष्य केलं होतं. सत्ताधारी पक्षातील  नेत्यांनी ही त्यावर भाष्य केलं. तसेच लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यानंतर चौकशी संदर्भात उपायोजना केल्याचं सांगण्यात आले.  त्या घटनेचा कुणालाही माघमुस लागला नाही. मात्र शरण येणार आहेत याचे मेसेज सर्वत्र प्रसारित झाले. म्हणजे पोलीस सोडून सर्वांना सगळं काही माहिती होतं. अशी शंका व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वाल्मिक कराडांच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 


हा प्लॅनिंग करून शरण येण्याचा कट- अंजली दमानिया


वाल्मिक कराड यांना शरण येण्याचा अखेर आज मुहूर्त मिळाला म्हणायचं. कारण मागील दोन दिवसापासून ते शरण येणार अशा बातम्या आपण ऐकत होतो. मात्र हा प्लॅनिंग करून शरण येण्याचा कट आहे. हे सर्व ऐकून थोडीशी गंमत वाटली. म्हणजे सर्व पोलीस यंत्रणा ही दोन दिवस त्यांच्या टच मध्ये होती का? त्यांना कुठून कळलं की आज ते शरण येणार आहेत? मला हे सर्व विचार करून त्रास होतो आहे की जो माणूस 17 तारखेला ज्याचे कॉल ट्रेकिंग केलं त्यानुसार तो पुण्यात होता.  आणि आज 31 तारखेला हाच व्यक्ती पुण्यात सरेंडर करतो. याचा अर्थ  म्हणजे तो गेल्या दोन आठवड्यापासून पुण्यातच होता आणि तो सीआयडी, पोलिसांना  मिळाला नाही. आणि दोन दिवस झाले पोलिसांना कळतं की तो सरेंडर होणार आहे.  म्हणजे वाल्मीक कराड सारख्या माणसाला राजकीय सरातून पाठबळ मिळत आहे हे त्यातून स्पष्ट होतं. जेव्हा बारा वाजता चा मूर्त त्यांना  समर्पण करण्याचा मिळाला, मात्र त्या संदर्भाच्या बातम्या या सकाळपासून येत आहेत. येतो पोलिसांच्या संपर्कात कुठे ना कुठे होता. किंबहुना गेल्या पंधरा तारखेपर्यंत त्याला पोलीस संरक्षण होतं. याबाबत मी पोलिसांना विचारणा केली असता  त्यांना पळून जाण्याची मुभा देण्यात आली का? अशी शक्यता आहे. मुळात खंडणीच्या गुन्हा त्यांना तात्काळ अटक करणे अपेक्षित होतं. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. यात कुठेतरी राजकीय लागेबंध आहेत. याचा सखोल तपास झाला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.


संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर लोटला


या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला, या घटनेतील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत, त्याच्या निषेधार्थ बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. बीडमध्ये मूक मोर्चाला हजारो लोक हातामध्ये छोटे-छोटे पोस्टर घेऊन संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करत होते, हजारो लोक मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं चित्र दिसून आलं. सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते, संघटना यांच्यासह बीड जिल्हा रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. 


नेमकं काय आहे प्रकरण?


बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात असून वाल्मिक कराड सध्या फरार होता, त्यानंतर अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर आज अखेर वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलं आहे. 


वाल्मिक कराड कोण आहेत?


वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी वाल्मिक कराडने पाहिली आहे. धनंजय मुंडेंचे राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावलीसारखे त्यांच्यासोबत आहे. जिल्ह्यातील सरकारी, सामाजिक सर्व कार्यक्रम कराड पाहतो. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे ते जिल्हा चालवायचा. वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. कराड यांचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत, ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे.


सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील घटनेचा घटनाक्रम 


बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 23 दिवस होत आहेत. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर वारंवार आरोप होत असलेले तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे.


6 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि इतर अनोळखी इसमानी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघा विरोधात गुन्हा दाखल झाला.


9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. सरपंचाचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणां विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.


10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला. त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली...


मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थी नंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार केले. 


11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुले याला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली.


11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मीक कराड यांच्यावर आरोप करत यांना दोषी ठरवले.


तर सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.


11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी अका असतील... त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी केली.


13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.


तर त्याच 13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला.


14 डिसेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.


14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटे याची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली.


या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले.. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली.


18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली.


19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला.. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या.. आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं..


21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली.. आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला..


21 डिसेंबर रोजी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले..


तर 21 डिसेंबर रोजी नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली..


24 डिसेंबर रोजी मसाजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला..


28 डिसेंबर रोजी तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मीक कराड यांच्यावर या प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी.. या मागणीसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला..


आतापर्यंत या प्रकरणात सीआयडीने जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी केली आहे. यात वाल्मीक कराड यांच्या पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी झाली आहे..


धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली.. या प्रकरणात गुन्हा नोंद आहे.. ज्याचा तपास सध्या सीआयडी करत आहे