पुणे : ईयर एंडिंगच्या निमित्ताने पुण्याजवळ होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेने विरोध केला आहे. सनबर्नमुळे महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात येईल, असा सनातनचा दावा आहे. दुसऱ्या बाजूला राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सनबर्नला सरकारचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.

संगीत, मनोरंजन, गाणी, खाद्ययात्रा, शॉपिंग यांनी भरलेला सनबर्न फेस्टिव्हल हा 28 ते 31 डिसेंबरच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील केसनंद येथे होणार आहे.

राज्य सरकारांनी दिलेल्या आमंत्रणानंतरच सनबर्न पुण्यात कार्यक्रमासाठी तयार झाल्याचं रावळ यांचं म्हणणं आहे. देशातील आघाडीचे गायक आणि डीजे आर्टिस्ट यांच्या लाईव्ह परफॉर्मन्समुळे तरुणाईमध्ये सनबर्नच मोठं आकर्षण आहे. मागील नऊ वर्षे सनबर्न गोव्यामध्ये आयोजित होत होता. त्यादरम्यान सनबर्नने कर चुकवल्याचा आरोप सनातनने केला आहे. त्याचबरोबर सनबर्नमध्ये अमली पदार्थांचा वापर होत असल्याचंही सनातन संस्थेचं म्हणणं आहे.



सनबर्नने सनातनचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अंमली पदार्थ वापरल्याचा सनबर्नवर एकही गुन्हा नाही, असं सनबर्नच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. सनबर्नवर अंमली पदार्थांच्या वापराचा आरोप करणाऱ्या सनातन संस्थेवरच राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मानसिक आजारांसाठी वापरली जाणाऱ्या औषधांचा साठा केल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे.