पुणे : कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा काही लोक घेत आहेत. या काळात चढ्या भावाने वस्तू विकल्या जात असल्याचं समोर येत आहे. पुण्यात लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना लुटणाऱ्या पाच विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तीन किराणा दुकानदार, एक मेडिकल, एक गॅस एजन्सीचा समावेश आहे. हे दुकानदार जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दरानं विक्री करत होते. याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. अजूनही छापासत्र सुरू असून कारवाईत वाढ होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेरला पुनाजी चौधरी हा दुकानदार पंचरत्न सुपर मार्केटमध्ये चढ्या दराने धान्य विक्री करत होता. शेंगदाणे 180 रुपये किलो, तूरडाळ 160 रुपये, मुगडाळ 155 रुपये, चणाडाळ 140 रुपये किलो, खोबरं 280 रुपये किलो, शाबूदाणा 135 रुपये किलो आणि साखर 48 रुपये किलो दराने विकत होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसरीकडे खडकी बाजारला गौरव अग्रवाल हा बीएम अग्रवाल किराणा दुकानात शेंगदाणे 140 रुपये किलो, गोटा खोबरे दोनशे वीस रुपये किलो या भावाने विकत होता. त्यामुळे या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर होम लिंक इंटरप्राईजेसचा मालक भूपेश गुप्ता आणि रोहन शुक्ला यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार लाख 30 हजार रुपयाचे 70 हजार 805 मास्क जप्त केले आहेत. त्यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


तर टिळक रोडला अग्रज फूड प्रोसेसर या दुकानावर छापा टाकला. दुकानाचे मालक बाळकृष्ण थत्ते हे हे वाढीव दराने विक्री करत असल्याचे आढळून आलं. त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. तर चंदन नगर परिसरात वडगाव शेरीला 796 रुपयाचा घरगुती गॅस सिलेंडर 1000 रुपये चढ्या दराने विक्री करत असल्याचं समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी अमित गॅस एजन्सीचा मालक अमित गोयलवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून 33 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.


एकीकडे कोरोनाच्या या महामारीच्या काळात दानशूर लोक मदतीसाठी पुढं येत असताना दुसरीकडे याच काळात लोकांना अशा प्रकारे चढ्या भावाने वस्तूंची विक्री करुन लुटण्याचं काम अनेक ठिकाणी सुरु आहे. यावर प्रशासनाचं लक्ष असून अशा प्रकारे चढ्या भावाने विक्री करणाऱ्या आस्थापनांवर छापासत्र सुरु ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.