पुणे : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अर्थात पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. पुण्यात पुलोत्सवाचा शुभारंभ होणार असून त्याच्या पूर्वसंध्येला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुण्यातील भांडारकर रोडवर असलेल्या पुलंच्या 'मालती माधव' या निवासस्थानाला भेट दिली. पुलंच्या घरी येऊन ब्रॅडमन भेटीचा आनंद मिळाल्याची भावना सचिनने व्यक्त केली.

पुलंच्या साहित्याचा प्रचार करण्यासाठी 'I Love PL' ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यावेळी 'आय लव्ह पीएल'च्या लोगोचं अनावरणही सचिनने केलं. पुलंच्या कुटुंबीयांशी संवाद साधत सचिनने जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. सचिन आल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना पुलंच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

आपण पाच वर्षांचे असताना पुलंशी पहिल्यांदा भेट झाली होती, अशी आठवण सचिनने सांगितली. त्यानंतर 1996 साली पुलंसोबत जेवण घेतल्याचा किस्साही सचिनने सांगितला. तेव्हाचा सचिन आणि पुलंचा एकत्रित फोटोही पुलंच्या घरी होता. सचिनने तो फोटो आवर्जून दाखवला.

दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्या नव्वदाव्या बर्थडेला आपण गेलो होतो, तशीच फीलिंग मला आता येत आहे, अशी भावनाही सचिनने व्यक्त केली. 'मी जितक्या पुलंच्या सीडीज बघितल्या त्यातून जाणवलं की ते 'कॉमन मॅन'शी किती सहज कनेक्ट व्हायचे. ही देणगी असते' अशा शब्दांत सचिनने पुलंना आदरांजली वाहिली.