पुणे : चितळे दुधामध्ये काळा रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत एफडीएकडे तक्रार न करण्यासाठी 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. या चार जणांमध्ये एका शिक्षक महिलेचा समावेश आहे. महिला पुण्यातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. दुकान बंद करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांनी ही खंडणी मागितली होती.
शिक्षक असलेल्या पुनम परदेशी हिने चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे ई-मेलद्वारे प्रत्यक्ष आणि फोनद्वारे दुधात काळा रंगाचा पदार्थ आढळला असल्याची तक्रार केली होती. यासाठी तुमच्या विरोधात एफडीए व पोलिसांकडे तक्रार करते. हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा, नाहीतर तुमचे दुकान बंद करू, तुमची बदनामी करू अशा धमक्या देत पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली होती.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर चितळे डेअरीकडून या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. यातील आरोपी महिलेची माहिती काढली असता ती एका नामांकित शाळेत शिक्षिका असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ही चितळे दूधही वापरत नसल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना पकडण्यासाठी सापळा रचला. दरम्यान चितळे डेअरीवाले पाच लाख रुपये देण्यासाठी तयार झाल्याचे पाहून त्यांनी ही रक्कम वाढवून 20 लाखांवर नेली. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना पकडण्यासाठी बनावट नोटांचे बंडल तयार केले आणि या नोटा स्वीकारताना चारही जणांना रंगेहात पकडण्यात आले.
यातील आरोपी पुनम परदेशी ही पुण्यातील एका नामांकित शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तर सुनील परदेशी आणि करण परदेशी यांचा लाँड्रीचा व्यवसाय आहे. यातील सुनील परदेशी, करण परदेशी आणि अक्षय कार्तिक यांच्याविरोधात यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत.