Rohit Pawar Rap Song : सध्या तरुणांमध्ये रॅप सॉंगची मोठी क्रेझ आहे. रॅप करुन अनेक तरुण प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे सोबतच या रॅपमध्ये वापरण्यात येणाऱ्या भाषेमुळे अनेकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र याच रॅप सॉंगचा वापर जनजागृतीसाठी होऊ शकतो हे आमदार रोहित पवार यांनी ओळखलं आणि रॅप सॉंगला नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला. तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी रॅप सॉंग तयार केलं. 


महाराष्ट्रातील युवक-युवतींना एकत्रित आणून राज्याच्या भविष्याच्या धोरण निर्मितीमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र व्हिजन फोरम ही एक प्रभावी युवा चळवळ सुरु केली आहे. युवांना त्यांच्या राज्याच्या विकासाबद्दल असलेल्या अपेक्षा या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवता येत आहेत. राज्यातील विविध शहरांमध्ये महाविद्यालयात जाऊन आमदार रोहित पवार हे तरुणाईशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांना अगदी मनमोकळी उत्तरे देखील देत आहेत. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक युवांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणी आणी युवा रॅपर्स यांच्यामध्ये जरा वेगळेच असे समीकरण आपल्याला पाहायला मिळाले आहे. अशातच रॅपच्या माध्यमातून तरुणाईला महाराष्ट्र व्हिजन फोरम या युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाबद्दल सांगण्यात आले आहे. अनेक वेळा रॅप म्हटलं की शिव्या, अर्वाच्य भाषा असे दिसते. परंतु या महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या रॅपमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने शब्द मांडणी करुन उपक्रमाचा उद्देश आणि एकंदर संपूर्ण संकल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्तम संगीत आणि शब्दांच्या बांधणीमुळे सध्या तरुण वर्गात या रॅपचा बोलबाला दिसून येत आहे. 


तरुणाईच्या सध्याच्या काळातील ट्रेन्ड लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विजन फोरम युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाचे रॅप सॉंग लॉन्च केले आणि अल्पावधीतच ते व्हॉट्सॲप आणि इतरही समाज माध्यमांवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. शुभम जाधव अर्थात रॉक्सन या उभरत्या रॅपरने हे गाणे गायलेले आहे. 


रॅप तुफान व्हायरल...


जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या या रॅप सॉंगला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तरुणांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवण्याकडे तरुण नेत्यांचा कल असतो. त्यामुळे त्या पिढीला शोभेल आणि समजेल अशा रॅपचा वापर करुन लोकापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न मांडण्याचं कार्य या फोरमद्वारे केलं जात आहे.