पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पुणे कोर्टात वकिलीचा कोट घालून हजेरी लावली. रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण 7 आरोपींना पुणे पोलिसांनी पुण्यातील एका खोलीत सुरु असलेल्या पार्टीत कोकेन आणि गांजा सापडल्या प्रकरणी कोर्टात हजर केलं होतं. या सुनावणीला रोहिणी खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या देखील वकील म्हणून हजर होत्या. प्राजंल खेवलकर यांच्यावतीनं विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. कोर्टातील कामकाज संपल्यानंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहिणी खडसे यांनी केवळ दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली.
रोहिणी खडसे यांनी कोर्टातील सुनावणी बाहेर पडल्यानंतर हा सगळा विषय न्यायप्रविष्ठ आहे, असं म्हटलं. यावरती माझी भूमिका योग्य वेळी मांडणार असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलं.
ईशा सिंगचा वापर प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यासाठी : विजयसिंह ठोंबरे
प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी कोर्टात युक्तिवाद केला. ठोंबरे यांनी दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आले आहे, असं म्हटलं. ईशा सिंग हीच्या पर्समधे सिगारेटच्या रिकाम्या पाकीटात कोकेन सापडले आहे. ईशा सिंगला प्लांट करण्यात आले होते. पोलीस आता त्या दोन महिला आरोपींना पोलीस न्यायालयीन कोठडीची मागणी करत आहेत आणि प्रांजल खेवलकर यांची मात्र पोलीस कोठडी मागत आहेत, असा युक्तिवाद विजयसिंह ठोंबरे यांनी केला. प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांच सेवन केलेले नाही आणि त्यांच्याकडे अंमली पदार्थ सापडलेले देखील नाहीत. अंमली पदार्थांचा फॉरेन्सिक रिपोर्ट मुद्दामहून लवकर येत नाही, असं देखील विजयसिंह ठोंबरे म्हणाले.
तपास अधिकाऱ्यांकडून आरोपींच्या पोलीस कोठडीच्या मुदतवाढीची मागणी
तपास अधिकारी यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार तपासात राहुल नावाच्या नवीन इसमाबाबत माहिती मिळाली आहे. तो हुक्का भरण्याच काम करत होता. त्याचा शोध घ्यायचा आहे. अंमली पदार्थ कोठून आणले याबाबत आरोपी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे चौकशी करायची आहे. सातपैकी अटक असलेल्या दोन महिला आरोपींची पोलीस कोठडी सध्या गरजेची नाही. या दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. मात्र, पाच पुरुष आरोपींकडे आणखी चौकशी करायची असल्याने त्यांची पोलीस कोठडी मिळावी. आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक गॅझेटस जप्त करण्यात आली आहेत. त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी मिळावी,अशी मागणी तपासअधिकाऱ्यांकडून करण्यात आली.