पिंपरी चिंचवड : लॉकडाऊनमुळे अनेकांच्या मनात नकारात्मक विचार घुटमळतायेत. यातून काहींनी नको ती पावलं उचलली तर काही तसा विचारही करतायेत. अशा सर्वांनी पिंपरी चिंचवडमधील रिक्षाचालक नागेश काळे यांच्या जगण्याचा हा संघर्ष पहायला हवा. अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्यानंतर जशी त्यांनी उभारी घेतली, अगदी तसंच न खचता लॉकडाऊनशीही नागेशनी यशस्वी मुकाबला केला. यासाठी कुटुंबाचा मिळालेला पाठिंबा ही महत्वाचा ठरला.
पिंपरी चिंचवडमधील 29 वर्षीय लढवय्ये रिक्षाचालक नागेश काळे यांचे नियतीने दोन्ही पाय हिरावून घेतले. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना अपंगत्व आलं. 2013 मध्ये मुंबईला कामानिमित्त गेलेले नागेश रेल्वेने पुण्याला परतत होते. पिंपरी चिंचवडच्या कासारवाडीत ते रेल्वेतून खाली पडले. झालेल्या दुर्घटनेत त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. सुरुवातीपासूनच रिक्षा चालवणाऱ्या नागेश वर कुटुंबाचा अख्खा भार होता. त्यामुळं खचून न जाता उभारी घ्यायचं ठरवलं आणि अवघ्या शंभर दिवसांत पुन्हा एकदा रिक्षाचं स्टेरिंग आपल्या हाती घेतलं. इतक्या मोठ्या संकटाशी सामना केलेले नागेश लॉकडाऊनमुळे खचले तर नवलंच. नागेश म्हणतात, गेली दहा वर्षे मी रिक्षा चालवतोय. पण संचारबंदीचा अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदाच होता. मी आधीपासूनच खूप अडचणींचा सामना केलाय. सात वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात दोन्ही पाय नियतीने हिरावून घेतले. पण मी मात करायचं ठरवलं आणि केलीही. परिस्थिती कोणतीही असो आपण खचू शकत नाही हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील अडचणींशी सामना करू शकतोय आणि पुढे ही करत राहीन. असा भीम विश्वास ते व्यक्त करतात.
फ्लॅटचे हप्ते थकले, त्यात शेजारणींचे टोमणे, तणावातून विवाहितेची आत्महत्या
मुलाचे पाय निकामी झाल्याने आई काशीबाई काळे खचल्या होत्या
मुलाचे दोन पाय निकामी झाल्याने आई काशीबाई काळे खचल्या होत्या. जणू त्यांचं आयुष्य अंधारमय झालं होतं. जखमी अवस्थेतील मुलाची प्रत्येक हाक काशीबाईंना अश्रू अनावर करणाऱ्या ठरत होत्या. पण काळ लोटला आणि आज अनेक आघात झेललेल्या आईचा आनंद गगनात मावेनासा झालाय. आईने कर्ज काढून दिलेल्या रिक्षाचे स्टेरिंग मुलाने शंभर दिवसानंतर हाती घेतलं. तेव्हाच मुलाने आयुष्याची नवी कास धरली होती, असं म्हणत काशीबाईंनी आनंदाश्रूची वाट मोकळी केली.
अपघातानंतरही प्रेम कहाणी सुरुच
अपघातानंतर दोन वर्षांनी नागेश आणि अर्चना काळे या विवाहबंधनात अडकले. त्यांची प्रेम कहाणी, ही अपघातापूर्वी पासूनच सुरू होती. मात्र, लग्नापूर्वीच प्रियकराने दोन्ही पाय गमावले तरी प्रेयसीने प्रेमालाच आयुष्य समर्पित केलं. नागेश यांच्या सुख आणि दुःखात कायमच पाठीशी राहण्याचा आधीच निश्चय केला होता. त्यामुळं अपघातानंतर दुःखाचा डोंगर कोसळला, पण त्यांना एकटं सोडण्याचा विचार मनात आलाच नाही. म्हणूनच आज आम्ही सुखाने नांदत असल्याचं अर्चना सांगतात.
नागेशच्या जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीला कुटुंबाची मोलाची साथ लाभली, त्यामुळेच आज काळे कुटुंबीयांच्या संसाराला लॉकडाऊनची ही नजर लागू शकली नाही. म्हणूनच आयुष्यातून पळ काढणाऱ्यांच्या रांगेत नागेश कधीच दिसले नाहीत अन् दिसणारही नाहीत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय उध्वस्थ झाले. त्या सर्वांनी नागेश काळेंची ही प्रेरणादायी आणि संघर्षमय कथा पहावी आणि जगण्याची नवी उमेद निर्माण करावी.
Rajesh Tope PC | आशा सेविकांना एक तारखेपासून तीन हजार रुपये मानधन मिळणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे