पिंपरी-चिंचवड : विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पिंपरी-चिंचवडमधल्या दोन महिलांनी रिक्षाचालकाकडून खंडणी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर एका महिलेला अटक झाली आहे तर दुसरी महिला पसार झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वकिल शिल्पा शिंदे आणि सराईत गुन्हेगार सारिका थोरात या दोघींनी खंडणीसाठी विनयभंगाचा बनाव करण्याचा कट रचला. या दोघींनी एका रिक्षाचालकाला गाठलं आणि जागा पाहाण्याच्या बहाण्यानं पिंपरी-चिंचवड परिसरात फिरवलं. मोहननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर दोघीही रिक्षा थांबवून खाली उतरल्या. त्याचवेळी आलेल्या पोलिसांना रिक्षाचालकानं आपला विनयभंग केल्याचं सांगितलं.
त्यानंतर तिघांनाही पोलीस ठाण्यात आणलं गेलं. मात्र पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपली कोणतीही तक्रार नसल्याचं दोघींनी पोलिसांना सांगितलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर येत दोघींनी रिक्षाचालकाकडे 1 लाख रुपयांची मागणी केली.
पैसे नाही दिले तर पुन्हा पोलिसांकडे जाऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या रिक्षाचालकानं महिलांना 30 हजार रुपये दिले. त्यानंतर रिक्षाचालकानं पोलिस आयुक्तालय गाठलं आणि दोघी महिलांविरोधात लेखी तक्रार दिली आणि या महिलांचा बिंग फुटलं.