Pune Power Cut : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (Pune Power Cut ) अतिउच्चदाब 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरुवारी (18 मे) रात्री 7: 10 वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे चाकण एमआयडीसीसह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 3 लाख 55 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे 1 वाजेपासून सकाळी 8:55 वाजेपर्यंत सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला.


दरम्यान, या तांत्रिक बिघाडामुळे महापारेषणचे अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडल्याने तसेच भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री 10 वाजेपासून पहाटे 3 वाजेपर्यंत कोथरुड, एसएनडीटी, औंध, बाणेर, शिवाजीनगर, बालेवाडी, बावधन, मॉडेल कॉलनी, पाषाण आदी भागांमध्ये एक तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करावे लागले.  


याबाबत माहिती अशी की, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब 400 केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये गुरुवारी रात्री 7:10 वाजता तांत्रिक बिघाड झाला. पाहणीमध्ये तळेगाव नजिकच्या करंजविहिरे गावाजवळ अतिउच्चदाबाची एक वाहिनी तुटून दुसऱ्या वाहिनीवर पडल्याचे दिसून आले. त्यानंतर रात्रीच अदानी कंपनी आणि महापारेषणचे अभियंता व कर्मचाऱ्यांकडून संयुक्तपणे या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले.  


3 लाख 55 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित


परंतु, या बिघाडामुळे महापारेषण कंपनीच्या 400 केव्ही चाकण, 220 केव्ही चिंचवड, 220 केव्ही उर्से, 220 केव्ही चाकण, 132 केव्ही चाकण, 132 केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल 396 मेगावॅट विजेचे वहन बंद पडले होते. परिणामी पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी तसेच पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर, संपूर्ण प्राधिकरण आणि आकुर्डीमधील 50 टक्के भाग असा एकूण 3 लाख 55 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च आणि लघुदाहबाच्या सुमारे 5 हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.


सकाळी नऊच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत


महापारेषण व महावितरणचे सर्व वरिष्ठ अभियंता सातत्याने एकमेकांशी संपर्कात होते. एकीकडे उन्हाळ्यामुळे वाढलेली विजेची मागणी व तांत्रिक बिघाडामुळे 396 मेगावॅट विजेचे थांबलेले वहन या प्रतिकूल परिस्थितीत भारव्यवस्थापनाद्वारे वीजग्राहकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरु होते. यामध्ये साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला. महापारेषण व महावितरणचे उपकेंद्र टप्प्याटप्प्याने सुरु होत गेले त्याप्रमाणे ग्राहकांचा वीजपुरवठा देखील सुरळीत होत गेला. आज सकाळी 8:55 पर्यंत पॉवर ग्रीडच्या वीजवाहिन्यांमुळे खंडित झालेल्या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

संबंधित बातमी-

Pune Power Cut: पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित; तांत्रिक बिघाडाने नागरिकांचे हाल