Pune Crime News : पुण्यातील (Pune) एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल करुन कुटुंबियांना मारुन टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पाटस टोलनाका परिसरातून त्याला त्याब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी या पत्रकाराने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी सुरक्षा म्हणून त्याच्यावर गोळीबार केला आहे.


नेमकं काय घडलं?


पुण्यातील एका व्यवसायिकाला ब्लॅकमेल करत पाच कोटींच्या खंडणीची मागणी करुन पन्नास लाखांची खंडणी घेण्यासाठी आलेल्या दोघा खंडणीखोरांना पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस टोलनाक्याच्या परिसरात पाठलाग करुन पकडले. दरम्यान, व्यवसायिकासोबत पोलिस असल्याची चाहूल लागताच दोघांनी पोलिसांच्या अंगावर गाडीघालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी पिस्तूलातून दोन राऊंड गाडीच्या पाठीमागील चाकावर फायर केले. त्यानंतर मदतीसाठी आलेले पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने दोघा खंडणीखोरांना पकडले. दोघेही खंडणीखोर तोतया पत्रकार असल्याचे समोर आले आहे.


पोलीस आणि आरोपीत चकमक


पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यातच थेट पोलीस आणि आरोपीमध्ये सुरक्षेसाठी गोळीबार झाल्याचं समोर आलं. एकंदरीत सर्व पळापळ सुरु असताना आरोपीने पोलिसांच्या अंगावर गाडी घातली आणि गाडी अंगावर घातल्याने एका पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील एका 34 वर्षीय फिर्यादीची सोनिटीक्स नावाची कंपनी आहे. त्यामाध्यमातून ते व्यवसाय करतात. ऑगस्ट 2022 पासून आरोपी महेश हा त्यांना तो पत्रकार असल्याचं सांगत होता.  बदनामी करण्याच्या उद्देशाने खोट्या बातम्या तयार करुन प्रसारित करण्याबरोबरच खोट्या पोलीस केसमध्ये अडकवण्यासाठी धमकावत होता. त्याद्वारे महेश याने फिर्यादीकडून 3 लाख 80 हजार रुपयांची खंडणी उकळली आणि त्यानंतर देखील तो त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागत होता.


पोलिसांचा धाकच नाही...


मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने कहर केला आहे. रोज नव्या घटना समोर येत आहे. मारहाण, दहशत, चोरी आणि हल्ल्यांच्या घटनांचं प्रमाण जास्त आहे. त्यातच पोलिसांना मारहाण केल्याच्यादेखील घटना समोर येत आहे. पोलिसांवरच गाडी घातल्याने पोलिसांनी गोळीबार केला आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक उरला नाही का?, किंवा वर्दीची भीती उरली नाही काय़, असे प्रश्न पुन्हा उपस्थित होताना दिसत आहे.