Pune Pmc Recruitment News: पुणे महापालिका पदभरतीसाठी घेण्यात येणारं परीक्षा शुल्क कमी करण्यात यावा, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळेल. यासाठी  महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आलं. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


पुणे महानगरपालिका (PMC) विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 448 रिक्त पदं काढण्यात आली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच, 20 जुलै 2022 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. मात्र या अर्जासाठी शुल्क भरपूर असल्याने ही मागणी करण्यात आली आहे.


जाहिरातीमार्फत गट 2 मधील 4 पदे तर गट 3 मधील 444 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दहा ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले आहेत. पद भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी  1000 रुपये तर मागसप्रवर्गाच्या उमेदवारासाठी 800 रुपये ऑनलाईन पद्धतीने आदा करावे अशी जाहीरातीमध्ये सूचना देण्यात आली आहे. 


या जाहिरातीला अनुसरून राज्य भरातून परीक्षेसाठी अर्ज येण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राज्यात अनेक दिवस लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेकांची एक हजार रुपये व आठशे  रुपयांचे परीक्षा शुल्क भरणे कठीण जाणार आहे. तसेच पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवासखर्च ही सहन करावा लागणार आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन आपण या परीक्षेसाठी लागणारे परीक्षा शुल्क कमी करून ते दोनशे ते पाचशे रुपयांच्या आत करावे ही विनंती. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला भारतीय जनता पार्टी मार्फत आंदोलन करावे लागेल. असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.