Pune Rapido News : पुण्यातील नागरिकांनी दुचाकी आणि तीन चाकी टॅक्सीचा उपयोग करु नये, अशा सूचना आरटीओकडून करण्यात आल्या आहेत.  दुचाकी आणि तीन चाकी रॅपिडो टॅक्सींना प्रवास वाहतूक करण्याची परवानगी नाकारली आहे.  त्यामुळे नागरिकांनी रॅपिडो अॅपचा वापर करुन प्रवास करु नये, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. काही दिवसांपासून पुण्यातील रिक्षा चालकांकडून दुचाकीवरुन प्रवासी वाहतूक करण्याच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली होती. त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. 


रॅपिडोची सेवा बेकायदेशीर असून प्रवाशांच्या सुरक्षित नाही. यामुळे प्रवाशांसाठी हे हानिकारक आहे, असं आरटीओने नमूद केलं आहे.  आरटीओने हा अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत नाकारला आहे. त्यामुळे आता रिक्षाचालकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.


केंद्र शासनाच्या  मार्गदर्शक सुचनांनुसार, महाराष्ट्र राज्यात शासनाने किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारची कोणतीही योजना अद्याप राबविलेली नाही आणि बाईक टॅक्सी प्रकारचा परवाना जारी केलेला नाही. तसेच बाईक टॅक्सी बाबत भाडे आकारणी धोरण अस्तित्वात नाही. त्यामुळे परवाना नाकारण्यात येत आहे, असं आरटीओने नमूद केलं आहे.


रॅपिडो यांच्याकडून कायदेशीर बाबीची पूर्तता होत नसल्यामुळे आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे दुचाकी टॅक्सीकरिता आणि  कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे तीनचाकी टॅक्सीकरिता परवाना देण्याचा त्यांचा अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी नाकारलेला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी दिली आहे.


रॅपिडो बंद करा; रिक्षाचालकांनी केली होती मागणी
मागील काही दिवसांपासून रॅपिडो बंद करा, अशी मागणी रिक्षाचालकांनी लावून धरली होती. रिक्षाचालकांनी बंद पुकारत आणि आंदोलन करत रॅपिडोचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षाचालकाच्या आंदोलनाता तत्पूरती स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतरही रॅपिडो सुरु असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे रिक्षाचालक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले होते. 13 डिसेंबरला त्यांनी चक्का जाम करत आंदोलन केलं होतं. या आंदोलनापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र तरीदेखील रिक्षा चालक रॅपिडोसंदर्भात आक्रमक झाल्याचं चित्र होतं. 13 डिसेंबरला चक्का जाम केला होता. याचा पुणेकरांना त्रास सहन करावा लागला होता. पुणेकरांना वेठीस धरल्यामुळे वाट बघतोय रिक्षा वाला संघटनेच्या अध्यक्षाला आणि त्यासोबतच 37 रिक्षाचालकांना अटक करण्यात आली होती. मात्र रॅपिडोची परवानगी नाकारल्याने रिक्षाचालकांच्या प्रयत्नांना यश आलं आहे.