Ram Navami 2023 : भारतात अनेक राम भक्त आहे. त्यांचा जल्लोश (Ram Navami 2023)आपण पाहिला आहे मात्र राम मंदिरासाठी पादत्राणे त्याग करण्याचा निर्धार करणारे एक राम भक्त आहेत. मागील 30 वर्ष 3 महिने त्यांनी चप्पल परिधान केली नाही आहे. जोपर्यंत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत चप्पल परिधान करणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. चंद्रकांत गुंडावर असं या राम भक्ताचं नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील या राम भक्ताने राम मंदिरासाठी मागील 30 वर्षांचा प्रवास अनवाणी पायाने केला आहे.
चंद्रकांत गुंडावार हे मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात राहतात. ते निस्सिम रामभक्त आहेत. 1990 मध्य़े ते कारसेवेसाठी गेले होते. भाजप, विश्व हिन्दू परिषद आणि बजरंग दल या हिंदूत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन भव्य कारसेवेचं आयोजन केलं होतं. लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेचं नेतृत्व केलं होतं. यात हजारो तरुण या कारसेवेत सहभागी झाले होते. त्यावेळी कोठारी बंधूंनी बाबरी मशिदीवर भगवा फडकवला होता. या सगळ्या तणावपूर्ण वातावरणात पोलीसांनी केलेल्या गोळीबारात कोठारी बंधुंचा मृत्यू झाला. त्यानंतर 1992 मध्येदेखील कारसेवेची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा शेकडो कारसेवकांनी बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केला. चंद्रकांत गुंडावर यांचादेखील या कारसेवकांंमध्ये समावेश होता. त्यावेळी राम जन्मभूमी स्थळावर भयंकर गोंधळ निर्माण झाला होता.
अन् अयोध्येतच सोडली चप्पल!
या कारसेवेच्या वेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच वेळी रामासाठी आपण महाराष्ट्रातून अयोध्येत आलो मात्र रामासाठी आपण अजून काय करु शकतो, याचा विचार करत असताना चंद्रकांत गुंडावार यांनी पादत्राणे त्याग करण्याचा निर्धार केला. 6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त केल्यानंतर जोपर्यंत राम मंदिराची स्थापना होत नाही किंवा त्यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निश्चय केला आणि अयोध्येतच चप्पल सोडून घरी परतले. त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे गेली 30 वर्ष त्यांनी चप्पल परिधान केली नाही.
अनवाणी पायांनी केला 30 वर्षांचा प्रवास...
6 डिसेंबर पासून त्यांचा अनवाणी पायाने प्रवास सुरु झाला. घरातील लग्न समारंभ, ऊन, वारा पावसात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी निर्धार सोडला नाही. चंद्रपूर जिल्हा हा सर्वात उष्ण जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याकाळात चालताना अनेकदा निर्धार सोडण्याचा विचार त्यांच्या मनात आला मात्र त्यांनी निर्धार कायम ठेवला. उन्हातान्हात अनवाणी पायाने ते आजही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. शेतात काम करताना त्यांच्या पायाला अनेकदा काटे टोचले मात्र ते मागे हटले नाहीत.
कुटुंबियांचा मोठा पाठिंबा...
गुंडावार कुटुंब हे गावातील प्रतिष्ठित कुटुंब मानलं जातं. मागील अनेक वर्षांपासून त्याचं कुटुंब सामाजिक कार्य करतात. पायात चप्पल नसल्याने त्यांना अनेकांनी नावं ठेवले असतील मात्र त्यांनी या टीकेला कधीही उत्तर दिलं नाही. अयोध्येत चप्पल त्याग करुन आल्यावर त्यांनी हा निर्णय कुटुंबियांना सांगितला. तेव्हा कुटुंबियांनी कोणताही आक्षेप न घेता त्यांचा निर्णय मान्य केला आणि निर्धार पूर्ण करण्यासाठी त्यांना कायम मदत केली. पायाला झालेल्या जखमा पाहून कुटुंब अनेकदा खचून जायचे मात्र त्यांना धीर देण्यासाठी ते कायम सक्षमदेखील असायचे. कुटुंबियांनी दिलेल्या साथीमुळे मी हा निर्धार पूर्ण करु शकलो, असं चंद्रकांत गुंडावार सांगतात.
मंत्री मुनगंटीवार यांनी दिली कोल्हापूरी चप्पल..
5ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी आता चप्पल परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मोठा सोहळा आयोजित करुन त्यांना चप्पल देण्यात येणार होती. मात्र ही सगळी कहाणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना समजली. त्यावेळी ते अवाक झाले होते. पक्षाचा किंवा जिल्ह्यात मोठा कार्यक्रम घेऊ आणि त्यात गुंडावार यांची प्रेरणादायी कहाणी अनेकांपर्यंत पोहचवू असं त्यांनी सांगितलं होतं. काल राम मंदिरासाठी गडचिरोली येथील लाकूड पाठवण्यात आले. चंद्रपूर ते बल्लारपूर या दोन शहरांमध्ये सगळं वातावरण राममय झालं होतं. यावेळी काष्ठ पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं. सगळीकडे रामनामाचा जयघोष सुरु होता. याच कार्यक्रमात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोल्हापूरी चप्पल देऊन चंद्रकांत गुंडावार यांचा निर्धार पूर्ण केला.
अयोध्येचं दर्शन घेऊन निर्धार सोडणार...
चंद्रकांत गुंडावार सांगतात, 'आज माझा 30 वर्षांचा निश्चय पूर्ण झाला आहे. त्यात माझं कुटुंबिय माझ्या सोबत आहे. मला कोल्हापूरी चप्पल मंत्री मुनगंटीवार यांनी दिली मात्र मी अयोध्येत जाऊन राम मंदिराचं दर्शन घेणार आणि अयोध्येतच ती चप्पल परिधान करणार', असं त्यांनी सांगितलं आहे.