Raju Shetti on Murlidhar Mohol: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या भागीदारीत असणा-या गोखले कंन्स्ट्रक्शन कंपनीने (Gokhale Construction land scam) पुण्यातील मोक्याची ३ हजार कोटीची जागा 230 कोटीला हडप केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. मुरलीधर मोहोळ पुण्यातील मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून वादाच्या केंद्रस्थानी आले असून त्यांच्याच संगनमताने जागेचा ढपला पाडल्याचा आरोप होत आहे. 

Continues below advertisement

तुम्ही पैलवान आहात मी कोल्हापूरचा आहे (Jain Boarding Pune case)

राजू शेट्टी म्हणाले की, तुम्ही पैलवान (मुरलीधऱ मोहोळ) आहात मी कोल्हापूरचा आहे. जो जो आडवा येईल, त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. बिल्डर आणि मोहळांनी मिळून जागा विकल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्ष घालू भूमिकेवरूनही तोफ डागली. ते म्हणाले की, असल्या आश्वासनाची आम्हाला गरज नाही. हा व्यवहार रद्द झाल्याची ऑर्डर आल्यानंतर विश्वास ठेवू, तोपर्यंत लढा सुरुच असल्याचे ते म्हणाले. 

मुरलीधर मोहोळांवर जैन समाजाचा गंभीर आरोप (Murlidhar Mohol controversy) 

फडणवीसांनी सकारात्मक पाऊल टाकलं यासाठी आभार असल्याचे ते म्हणाले. दिवाळीनंतर स्थगिती आदेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्याला यावं, आम्ही त्यांचा सत्कार करू असे शेट्टी म्हणाले. दुसरीकडे, केंद्रीय राज्यमंत्री मुलीधर मोहोळ यांच्यावर जैन समाजाने गंभीर आरोप केला आहे. मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्यासोबत दोन बिल्डरांनी जैन बोर्डिंगची जागा हडप केल्याचा आरोप करण्यात आला. दुसरीकडे, बोर्डिंगची जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जैन समाजही प्रचंड आक्रमक झाला आहे. जैन समाजाने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालत जैन समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, जैन समाजाने केलेल्या आरोपांबाबत अद्याप मुरलीधर मोहोळ यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ते आज नियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला जाणार आहेत. मात्र, गंभीर आरोपांमुळे मुरलीधर मोहोळ यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी राजकीय वर्तुळात कुजबुज रंगायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या सगळ्यावर मुरलीधर मोहोळ कधी मौन सोडणार आणि ते काय बोलणार, याची उत्सुकता आहे.

Continues below advertisement

जैन बोर्डिंग वादात ठिणगी कशी पडली? (Pune land deal news)

पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगरमधील आहे. जिथं दिगंबर जैन आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या