Pune Jain Boarding House: पुणे शहरातील मॉडेल कॉलनीच्या परिसरातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची (Jain Boarding Hostel) जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी नेत्यांवर गंभीर दोषारोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यात जैन समाजाकडून (Jain Community) आंदोलन करण्यात येणार आहे. जैन बोर्डिंग कृती समितीच्यावतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. (Pune News)
जैन बोर्डिंग हॉस्टेल विक्रीच्या मुद्द्यावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील जैन धर्मियांची मोक्याची तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कटकारस्थाने करून हडपली गेली असून यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्याचाच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून काही नेत्यांचे नातलगही यामध्ये पार्टनर असल्याचे कळते. इतर वेळेस स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या या लोकांनी धंदा आणि पैशांसाठी जैन मंदिरही गिळंकृत केलं. सत्तेचा वरदहस्त असेल तर फाईली किती वेगाने पळतात हे नवी मुंबईत सिडको प्रकरणात दिसलंच तसं या प्रकरणातही दिसून येत आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जैन बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी जैन मंदिराची जमीन हडपणाऱ्यांविरोधात आम्ही जैन बांधवांच्या लढ्यात सोबत आहोत. सरकारनेही यात हस्तक्षेप करुन त्यांना त्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा या प्रकरणाचे सर्व पुरावे आमच्याकडे असल्याने आम्ही या पुराव्यांसह रस्त्यावर उतरु, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
Pune News: जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेचा नेमका वाद काय?
पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
आणखी वाचा