पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्याच्या प्रचारसभेतही शिवसेना-भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महापालिका निवडणुकीनिमित्त शिवसेना-भाजपमधली भांडणं सुरु आहेत. याचा सर्वसामान्यांशी संबंध नाही. लोकांचं लक्ष्य आपल्यावर कायम राहावं यासाठी त्यांची ही नाटकं सुरु असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.


पुण्यातली भाजपची तिकीटं बिल्डर ठरवतो

1952-2017 एवढ्या काळात भाजपला अजून स्वतःचे उमेदवार सापडत नाहीत, असं सांगून राज ठाकरे म्हाणाले की, ''नाशिकमध्ये भाजपनं 77 गुंडांना निवडणुकीचं तिकीट दिलं. निष्ठावंतांना डावलून गुंडांना तिकीट देण्यासाठी पुण्यात बिल्डरचा भाजपवर दबाव आहे. तोच इथलं तिकीट वाटप करतो,'' असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शिवसेनेला लक्ष्य

मुंबईतल्या शिवस्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचा उल्लेख करुन राज ठाकरेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, ''शिवस्मारकाच्या भूमीपूजनावेळी उद्धव ठाकरे आणि मोदी एकाच बोटीवर गेले, पण मोदींनी त्यांच्याकडं पाहिलंही नाही. इतका अपमान होऊनही, सत्तेत आहेत. अजून कुठल्या अपमानासाठी थांबला आहात?'' असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

नाशिकमधील कामाचं सादरीकरण

याशिवाय नाशिकमध्ये मनसे नगरसेवकांनी केलेल्या कामाचं पीपीटी प्रेझेंटेशन दाखवून, नाशिकमध्ये हे घडू शकतो, तोच बदल पुण्यात का नाही? असा सवाल त्यांनी पुणेकरांना केला. नाशिकमधल्या कामाची माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, ''नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात ही माझी आवड आहे. नाशिकमध्ये 5 वर्षांत 560 किलोमीटरचे रस्ते तयार केले. मुकणे धरणातून पाईपलाईन टाकल्याने नाशिकचा पुढच्या 40 वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला. अशी अनेक कामं नाशिकमध्ये घडू शकतात. यातील काही कामं पुण्यातल्या उद्योजकांच्या माध्यमातून झालीत. हीच कामं पुण्यातही घडू शकतात,'' असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

राज ठाकरेंच्या भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे

पुण्यात 8 सभा घ्यायच्या होत्या, पण घरगुती कारणांमुळं शक्य झालं नाही : राज ठाकरे

शिवसेना-भाजपच्या भांडणाचा जनतेशी काहीही संबंध नाही : राज ठाकरे

काँग्रेस-राष्ट्रवादी जशी होती, तशी आता शिवसेना-भाजप झालीये : राज ठाकरे

2014 ची परिस्थिती आता नाही, भाजपचा आलेख खाली आलाय : राज ठाकरे

डम्पिंग ग्राऊंडचा त्रास इतर शहरात असतो, तसा नाशिकमध्येही होता, पण तिथे घनकचऱ्यातून खत प्रकल्प उभारला : राज ठाकरे

नाशिकमध्ये उड्डाणपुलांच्या खाली संपूर्ण सुशोभीकरण करून घेतलं, त्यामुळे अतिक्रमणं होत नाहीत : राज ठाकरे

नाशिकमध्ये अॅपच्या माध्यमातून 1850 तक्रारींचं निवारण केलं : राज ठाकरे