पुणे : एकीकडे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केल्यानंतर त्याचं मुद्द्यावरून आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ झाला आहे, त्याकडे सर्वांनी लक्ष द्या असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सर्वांनी आपल्या प्रभागांमध्ये जाऊन मतदारयांद्याबाबत जनजागृती करा, अशा सूचना त्यांनी दिल्याचं समजतंय. दरम्यान मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, चौकशी झाली तर 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल, असं वक्तव्यही राज ठाकरेंनी बैठकीत केलं आहे.

पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा

राहुल गांधी यांनी मत चोरी संदर्भात जो आवाज उठवला आहे त्याबाबत सर्वांनी आपल्या प्रभागात लक्ष देऊन मतदार यादींबाबत जनजागृती करावे असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. मतदारसंघामध्ये जाऊन प्रत्येकाने काम करावं, 40 माणसांमागे दोन ब्लॉक लेव्हल ऑफिसर नेमावेत असा सल्लाही राज ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे. याबाबत कुणी कुचराई केली तर त्या प्रभागात मी निवडणूक लढवणार नाही असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

मतदार याद्यांच्या घोळावर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आवाज उठवला आहे. त्यावर निवडणूक आयोगानेही स्पष्टीकरण दिलं आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडीचा राज ठाकरेंना फटका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुण्यातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याचं दिसून आलं. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना, सोन्या मारूती चौकातील कार्यक्रम आटोपून फुलेवाड्यातील कार्यक्रमाला जात असताना त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. अखेर पोलिसांनी वाट मोकळी दिल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा मार्गस्थ झाला.

मतचोरीवरुन आरोप-प्रत्यारोप

मतचोरीच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी मतचोरी उघड करून भाजपचा बुरखा फाडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. प्रामाणिकपणे निवडणूक घेतली तर भाजप जिंकू शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दुसरीकडे मतचोरीच्या आरोपांवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा साधला. मतचोरीचे आरोप करणाऱ्यांचं डोकं चोरीला गेल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली.

ही बातमी वाचा: