Pune Rain :  पुण्यात सोमवारी 105 मिलीमीटर पावसाची (pune rain) नोंद झाली. हा तीव्र स्वरुपाचा पाऊस होता. मात्र ही ढगफुटी नव्हती. उद्यापासून (19 ऑक्टोंबर ) राज्यभरातील पाऊस कमी होणार आहे आणि 22 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील 85 टक्के भागातून पाऊस परतलेला असेल, असं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितलेलं आहे. पुण्यात परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


सोमवारी, रात्री केवळ सव्वा तासात (रात्री 9:45 ते 11:00) या कालावधीत 90 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या परिसरात देखील तीव्र स्वरुपाचा पाऊस होता. त्यामुळे पुणेकरांची दिवाळी पाण्यात जाणार का?असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र 22 ऑक्टोंबरपर्यंत हा परतीचा पाऊस थांबलेला असेल, असा दावा हवामान खात्याकडून करण्यात आला आहे. 


आज संध्याकाळी पुण्यात पावसाची शक्यता


पुण्यात आज संध्याकाळी देखील पाऊस असणार आहे. मात्र हा पाऊस कालच्याएवढा तीव्र नसेल. त्यामुळे पुणेकरांनी पावसाचा अंदाज घेऊनच दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडावे, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. कालच्या पावसाने पुणेकरांचं मोठं नुकसान झालं. शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे लोट वाहत होते. मात्र आज, कमी प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. 


महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर नाही तर दक्षिण भागावर ढग दाटले आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यासह आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील भागात आर्द्रतेची पातळी हळूहळू वाढू लागली आहे. बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आणि 17 ऑक्टोबरपासून पश्चिम-वायव्य दिशेच्या हालचालींसह कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये विकसित झाल्यामुळे राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वरच्या हवेचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यासह राज्याच्या दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.


राज्यभरात परतीच्या पावसानं थैमान
राज्यभरातील अनेक शहरात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. पुणे, मुंबई, पालघर, नागपूर, ठाणे या शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळी पावसात साजरी करावी लागण्याची शक्यता आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे.


पावसावरुन राजकीय नेते आमने-सामने
पुण्याचा विकास पाण्यात वाहून जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी भाजपवर केली आहे. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर आणि पावसामुळे होणाऱ्या परिस्थितीवर राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्ला विरोधीपक्षनेने अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारला दिला आहे. त्यावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मागील अडीच वर्ष अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी शहराचं काम नीट करुन घेतलं नाही. काल पाणी साचलं आणि लगेच टीका करायला सुरुवात केली, असं ते म्हणाले.