पिंपरी : लोणावळ्यातील मंकी हिलजवळ रेल्वे ट्रॅक खचला असून, यामुळे काही काळासाठी मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. ट्रॅक खचल्याचं कोयना एक्स्प्रेसच्या मोटरमनला वेळीच लक्षात आल्यानं, मोठा अनर्थ टळला.


मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेसच्या मोटरमनला सकाळी 11.20 च्या सुमारास मंकी हिलजवळ ट्रॅक खचल्याचं निदर्शनास आलं. यानंतर त्यानं तत्काळ मध्य रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन, ट्रॅक दुरुस्त केला, आणि कोयना एक्स्प्रेस पुण्याच्या दिशेने रवाना केली.

दरम्यान, लोणावळ्या जवळचा मंकी हिल परिसरातील रेल्वे ट्रॅक मृत्यूचा सापळा बनला आहे. कारण दोनच दिवसांपूर्वी 19 जुलै रोजी मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेससमोर काही मोठे दगड आले होते. यामुळे लांब पल्ल्याची मध्य रेल्वेची वाहतूक जळपास अर्धा तासा खोळंबली होती.

तर 18 जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसचं इंजिन रूळावरून घसरलं आणि त्यानंतर थोड्याच वेळानंतर त्याच मार्गावर छोटे दगड कोसळले. यामुळे चार तास वाहतूक विस्कळीत होती.

30 जानेवारी रोजी याच ठिकाणी रेल्वे रूळावर दरड कोसळून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तर तीन कर्मचारी जखमी झाले होते. सुदैवानं यावेळी कुठलीही रेल्वे तिथून पास होत नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या घटनेनंतर रेल्वे वाहतूक सुमारे एक तास बंद होती.